अमरावती : आईनेच पैशासाठी एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा २० वर्षीय युवकाशी बालविवाह पक्का करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या बालविवाहाला मुलीनेच विरोध करीत थेट गाडगेनगर ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांसमोर कथन केला. मुलीच्या तक्रारीवरून मुलीची आई व युवकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
पोलीससूत्रानुसार, २० वर्षीय युवक (रा. रहाटगाव), ३८ वर्षीय महिला (रा. राजपूत ढाब्याच्या मागील झोपडपट्टी) असे आरोपीचे नाव आहे. १५ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंविचे कलम १०,११ बालविवाह प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा नोंदविला. सदर मुलगी ९ व्या वर्गात शिक्षण घेत आहे. मुलीच्या आईची व मुलाच्या आईची पूर्वीची ओळख असल्याने पैशासाठी तिने मुलीचा विवाह त्या २० वर्षीय तरुणाशी निश्चित केला. मात्र, किती पैशासाठी हा पक्का केला हे स्पष्ट होऊ शकले नाही. ही बाब मुलीला कळल्यानंतर सध्या मी लग्न करणार नाही. मला शिक्षण घ्यायचे आहे, अशी भूमिका मुलीने घेतली. त्यामुळे आईने मुलीला मारहाणसुद्धा केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. मात्र मुलीने विरोधतर केला. मात्र, न घाबरता तिने शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गाडगेनगर ठाण्यात धाव घेतली व गाडगेनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांना घडलेला प्रकार सांगितला. या गंभीर प्रकरणाची दखल घेत तिच्या तक्रारीवरून त्यांनी आई व युवकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. तसेच आईला तातडीने अटक केली. मुलीला मारहाण करण्यात आली का? यासाठी तिची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी पाठविण्यात आले. नियमानुसार तिची कोरोना चाचणीसुद्धा करण्यात आली.
बॉक्स
मुलीला पाठविले बाल निरीक्षण गृहात
फिर्यादी मुलगी ही अल्पवयीन असल्याने तिला निरीक्षण गृहात पाठविण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
बॉक्स:
आईला केले न्यायालयासमोर हजर
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मुलीच्या आईला तातडीने अटक करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी तिला न्यायालयासमोर हजर केले. मात्र, वृत्त लिहिस्तोवर पीसीआर मिळालेला नव्हता. पोलीस तरुणालासुद्धा अटक करणार आहेत.
कोट
मुलगी ही अल्पवयीन आहे. तिने स्वत: ठाण्यात येऊन तक्रार नोंदविली. त्यावरून आई व युवकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. मुलीच्या आईला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
- आसाराम चोरमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गाडगेनगर ठाणे