७३ कोटींचे पाणी बिल थकीत : जिल्हाधिकारी कार्यालयाला मजिप्राकडून पत्रअमरावती : महापालिकेचे विविध विभाग व सार्वजनिक नळांचे बिल व्याजासह ७३ कोटींवर पोहोचले असून यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती पुरविण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेवर कधीही थकीत पाणी बिलासाठी जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण शहरातील ८० हजार ४९५ ग्राहकांना पाणी पुरवठा करीत आहे. तसेच नॉनडोमॅस्टिक व सार्वजनिक नळांद्वारे २ हजार ठिकाणी पाणी पुरवठा केला जात आहे. दररोज ११० दशलक्ष लिटरचा पाणी पुरवठा शहरवासियांना केला जात आहे. महापालिकेचे विविध विभाग व सार्वजनिक नळांचे पाण्याचे बिल भरण्याची जबाबदारी महापालिकेचीच आहे. मात्र, गेल्या काही वर्षात महापालिकेकडे ३७ कोटींचे पाणी बिल थकीत आहे. या ३७ कोटींच्या बिलावर ३४ कोटींचे व्याज झाले असून गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेकडून हे थकीत बिल भरण्यात आले नाही. दरवर्षी ५० लाखांच्या जवळपास बिल महापालिकेकडून भरण्यात येत असल्याचे मजिप्रा अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, थकीत बिल ७३ कोटींवर पोहोचले आहे. यामुळे प्राधिकरणाची विकासकामे रखडली आहेत. हे बिल भरल्यास मजिप्राची आर्थिक समस्या सुटू शकते. त्यामुळे जप्तीच्या कारवाईचे संकेत प्राधिकरणने दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांची प्रतीक्षा आहे.
महापालिकेवर जप्तीची टांगती तलवार!
By admin | Updated: January 7, 2015 22:44 IST