पैकीच्या पैकी विजयी : परिवर्तन पॅनेलचा सफायाअंजनगाव सुर्जी : सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण मानली जाणाऱ्या अंजनगाव तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचा सफाया झाला असून १७ पैकी १७ ही जागा सहकार पॅनेलने जिंकल्या आहेत.माजी आमदार रावसाहेब हाडोळे व आ. रमेश बुंदिलेंसह अकोटचे आ. प्रकाश भारसाकळे यांच्या वरदहस्ताने तालुक्याच्या काही राजकीय नेत्यांची साथ घेऊन निर्माण करण्यात आलेल्या परिवर्तन पॅनेलला सहकार महर्षी स्व. गुणवंतराव साबळे व यादवराव देवगिरे यांचा सहकार वारसा पुढे चालवत असलेल्या जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनंत साबळे यांच्या सहकार पॅनेलने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे.येथील १७ संचालक पदासाठी झालेल्या खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत सहकार पॅनेलचे सोसायटी मतदारसंघात शरद कडू, दिनकर काकड, भूजंग कोकाटे, अशोक चरपे, नरेंद्र येवले, अविनाश सदार, शरद साबळे, अशोक हरणे या आठ जणांनी बाजी मारली असून वैयक्तिक भागधारक मतदारसंघात अमोल पोटे, विलास भांबूरकर, सदानंद वऱ्हेकर, बाळकृष्ण हरणे, महिला राखीवमध्ये कल्पना घोगरे, अर्चना पखान, इतर मागासवर्गीयांमध्ये सुरेश आठे, भटक्या विमुक्त जाती मतदारसंघामधून अमोल घुरडे, अनुसूचित जातीमधून गणेश मंडपे या सर्व सहकार पॅनेलच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. परिवर्तन पॅनेलचा एकही उमेदवार यांच्या मत संख्येपर्यंत पोहचू शकले नाही, हे विशेष.तालुक्यात सहकार पॅनेलच्या अस्तित्वापासून खरेदी-विक्री संघात सहकारचे कायम वर्चस्व असून प्रत्येक निवडणुकीत विरोधकांचा शह देण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. यावेळीसुद्धा सहकारातून दुरावलेल्या काही नेत्यांनी आजी-माजी आमदारांसह राजकीय नेत्यांचे पाठबळ मिळवून अस्तित्वाची लढाई लढण्याचा जिवापड प्रयत्न केला. राजकीय समीकरणातून आता परिवर्तन होणार अशा चर्चाही निर्माण झाल्या होत्या. परंतु सहकार पॅनेलशी सामना करताना पानीपत झाल्याने अनेक राजकीय धुरीणांना धक्का बसल्याचे चित्र तालुक्यातील सहकारात क्षेत्रात पहावयास मिळत आहे. (शहर प्रतिनिधी)
अंजनगाव खरेदी-विक्री संस्थेवर सहकार पॅनेलचा झेंडा
By admin | Updated: July 15, 2015 00:24 IST