नरबळी प्रकरण : विविध संघटना एकवटल्या अमरावती : प्रथमेश सगणे नरबळी प्रयत्नाच्याप्रकरणी आरोपींना अटक झाली असली तरी आश्रमाचे संस्थापक शंकर महाराज व व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत. त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी तालुक्यातील सर्व सामाजिक संघटनांनी धामणगाव बंदचे आवाहन केले आहे़ शास्त्री चौक येथून सकाळी १० वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. पिंपळखुटा येथील शंकर महाराज आश्रमात प्रथमेश सगणे या विद्यार्थ्याचा नरबळी देण्याच्या उद्देशाने गळा चिरण्यात आला. या आश्रमात धानोरा म्हाली येथील अजय वणवे या ११ वर्षीय विद्यार्थ्यावरही नरबळीच्या उद्देशाने हल्ला झाला होता. याप्रकरणी पीडित अजयच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे माणुसकीला कलंक लावणाऱ्या या घटनांच्या निषेधार्थ बंद आंदोलनात लहुजी शक्तीसेना, मानवी हक्क अभियान, कास्टट्राईब शिक्षक संघटना, रमाई बहुउद्देशीय महिला मंडळ, मनसे, जीवक संघटना, माथाडी कामगार संघटना आदी संघटना सहभागी होणार आहेत. लहुजी शक्तीसेनेचे उमेश भुजाडणे, मनसेचे रणजित पाटेकर, नीलेश वानखडे, शंकर वानखडे, विनोद तिरीले, संतोष वाघमारे, हरिचंद्र खडसे यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)
धामणगावात आज बंद
By admin | Updated: August 19, 2016 00:12 IST