गतवर्षी पावसाळा मोठ्या प्रमाणात व समाधानकारक झाला. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विहिरींना तसेच बोअरला बऱ्यापैकी पाणी असल्याने यावर्षी उन्हाळी पीक घेण्याचे शेतकऱ्यांनी ठरवले. परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे ती पिके हातातून जातील काय, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
एकीकडे कोरोना संसर्गाची भीती, तर दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे पिके नष्ट होण्याची धास्ती शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक
करीत आहेत. गतवर्षी भुईमूग काढण्याकरिता शेतकऱ्यांना अत्यल्प खर्च आला. परंतु, यावर्षी लॉकडाऊनमुळे मजूर मिळेनासे झाले आहेत. त्यातच जवळपास सर्वच शेतकरी एकाच वेळी पिकांची काढणी करीत असल्याने मजुराची कमतरता भासत आहे. जो शेतकरी मजुरी जास्त देईल, त्या शेतकऱ्याकडे मजूर पसंती देत आहेत. यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विहिरींना बऱ्यापैकी पाणी असल्याने मोठ्या प्रमाणात सिंचनक्षेत्र वाढले गेले. परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे आता मात्र शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फजिती होत असल्याने हातातोंडाशी आलेले पीक आपल्या घरी येईल की नाही, या विचारात मात्र शेतकरी दिसून येत आहेत.