धारणी : नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या १३ विहिरी व बोअरवेलचे ३५ लाख रुपये वीज देयके न भरल्याने महावितरणने दोन दिवसांपूर्वी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. परिणामी धारणी शहरात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजला आहे.
धारणी नगरपंचायतीने दोन वर्षांपासून १३ विहिरी, बोअरवेल या पाणीपुरवठा योजनेचे वीज देयकेच भरले नाहीत. ते थकीत वीजबिल ३५ लाखांपर्यंत पोहोचले. नगरपंचायतीला सूचना देऊनही थकीत बिलाचे पैसे न भरल्याने महावितरणला वीज कनेक्शन कापण्याची वेळ आली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज कापण्याची धडक कारवाई केली. परिणामी दोन दिवसांपासून धारणीकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहरातील सर्व महिला व नागरिक पाण्यासाठी टँकरच्या शोधात फिरत आहेत. एकाच वेळी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद झाल्याने टँकरवाल्यांना सुगीचे दिवस आले आहेत. ७०० रुपयांत मिळणारा टँकर एक हजार रुपयांवर मिळत असल्याने गरिबांची आर्थिक पिळवणूक होत आहे. नगरपंचायतीच्या करवसुलीतही मोठ्या प्रमाणात घोळ असून प्राप्त झालेला कर कोणता व कशा मार्गाने जातो याकडे नगरपंचायतीने लक्ष न देता विविध बिनकामाच्या कामावर मात्र कोट्यवधी रुपयाचा खर्च केल्याची माहिती आहे. त्यामुळे धारणी नगरपंचायत वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
कोट
महावितरणला ३५ लाखांपैकी २० लाख रुपयांचा धनादेश गुरुवारी दिला. त्वरित विद्युत पुरवठा जोडण्यात येणार असून शुक्रवारपासून पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार आहे.
- सुधाकर पानझडे,
मुख्याधिकारी
पंचायत समिती, धारणी
--------------