अमरावती : कोरोनाकाळात गरजूंना रक्ताची तसेच प्लाझ्माची नितांत गरज भासत आहे. कोविडकाळात उपचारादरम्यान रक्ताची पुरेशी उपलब्धता असावी, गरजूंना प्लाझ्मा उपलब्ध व्हावा, यासाठी नागरिकांनी सामाजिक बांधीलकी म्हणून रक्तदान करावे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, असे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी केले.
ना. ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी नांदगाव पेठ व तळेगाव ठाकूर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मातोश्री व ना. ठाकूर यांच्या वजनाचे रक्त संकलन रक्ततुला करण्यात आली. या उपक्रमाला नागरिकांनीही भरभरून प्रतिसाद दिला. पालकमंत्री ठाकूर यांचा वाढदिवस काँग्रेस कार्यकर्त्यांनी अगदी साध्या पद्धतीने लोकहितकारी अभिनव उपक्रम राबवून साजरा केला.
कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा, गरजूंना प्लाझ्मा या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून भरून काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भावना पुष्पमाला भैयासाहेब ठाकूर यांनी व्यक्त केली.
यशोमती ठाकूर यांच्या कन्या आकांक्षा ठाकूर, माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती दिलीप काळबांडे, अतुल वै. देशमुख, गजानन काळे, ओएसडी प्रमोद कापडे, रूपाली काळे, कुकडे, गवई, सातपुते, योगेश वानखडे, अनिकेत देशमुख, सचिन गोरे, अजिम शहा, शिवा तिखाडे, रुग्णसेवक वैभव बोकडे, सागर खांडेकर, उमेश राऊत, किसन मुंदाणे, प्रसाद लाजूरकर, संजय चौधरी, आशिष खाकसे, यज्ञेश तिजारे, अनिकेत प्रधान, आनंद शर्मा उपस्थित होते.
बॉक्स
तिवस्यात गुरांसाठी पाण्याचा हौद
तिवसा शहरातील पाळीव आणि मोकाट गाई व म्हशींसाठी पिण्याच्या पाण्याच्या हौदाचे वाटप आणि त्याचे परिसरातील पालकत्व देऊन वितरण करण्यात आले. शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष रूपाली काळे यांच्या संकल्पनेतून गोसेवा व्हावी आणि उन्हाळ्यात गायींना आणि म्हशींना पाणी उपलब्ध व्हावे, हा यामागचा उद्देश वाढदिवसानिमित्त व्यक्त केला गेला.
बॉक्स
वॉटर कूलर, मास्क अन् साहित्य वाटप
यावली (शहीद) प्राथमिक आरोग्य केंद्रातील आयुर्वेदिक दवाखान्यात वॉटर कूलर देण्यात आले. खोलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील साहित्य वाटप करण्यात आले. मोर्शी उपजिल्हा रुग्णालयाशी संलग्न नेरपिंगळाई आरोग्य केंद्रात वैद्यकीय साहित्य वाटप करण्यात आले. वलगाव येथे गरजू महिलांना टीनपत्रे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. वलगावचे माजी सरपंच राजेंद्र निर्मळ व अशफाक अली यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू महिलांना टिनपत्रे घरपोच देण्यात आले. नांदुरा बु. येथे मास्क वाटप करण्यात आले.