ठिय्या आंदोलन : सीईओंचे वेधले लक्ष अमरावती : नांदगाव खंडेश्र्वर येथील श्री खंडेश्र्वर संस्थान तीर्थक्षेत्र विकासातील मुख्य रस्ता मागील दोन वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. या कामातही मोठे गौडबंगाल झाले असल्याने मंगळवारी जिल्हा परिषदेत मुख्य रस्ता आंदोलन समितीने सीईओंच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. राज्य शासनाच्या वतीने श्री खंडेश्र्वर तिर्थक्षेत्रासाठी कोट्यवधींचा निधी मिळाला. मात्र प्रस्तावित कामात मंजूर असलेला नांदगाव खंडेश्र्वर गावात जाणारा मुख्य रस्त्याचे काम न करता सदरचे काम दुसरीकडे करण्यात आले. विशेष म्हणजे मुख्य रस्ता हा विकास कामासाठी दोन वर्षांपासून खोदून ठेवण्यात आला. परंतु अद्याप पर्यंतही मुख्य रस्त्याचे काम जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे पूर्ण करण्यात आले नाही. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतरही याची दखल न घेता वेळकाढूपणाचे धोरण स्विकारल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तीर्थक्षेत्र विकास कामातील संबंधित कंत्राटदार हा काम करत नसल्याने त्याला जिल्हा परिषदने दरदिवसाला दोन हजार रूपये दंडसुध्दा आकारला. अशातच या कंत्राटदाराचा कामाचा कालावधीसुध्दा संपला आहे. तरीही नागरिकांच्या दळणवळणाच्या रस्त्याचे कामे करण्यात आले नाही. परिणामी सध्या पावसाच्या दिवसात नागरिकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे मंगळवारी मुख्य रस्ता आंदोलन समितीने जिल्हा परिषदेत सीईओंच्या दालनात धडक देत काम सुरू करण्यासाठी ठिय्या दिला. दरम्यान मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी नागरिकांची बाजू समजून घेत याबाबत जिल्हा परिषदे मार्फत तातडीने कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. आणि सोबतच सीईओंनी कामाची पाहणी करण्याचे सुध्दा आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष मो जावेद, युवा सेना जिल्हा प्रमुख प्रकाश मारोटकर, उपनराध्यक्ष मुमताजबी नाजीमखॉ, उपसभापती वेखा नागोलकर, जि.प. माजी सदस्या शोभा लोखंडे, धनराज रावेकर, संजय पोकळे, सतिश पटेल, अरूण लाहाबर, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, बसपाचे जिल्हाध्यक्ष अभिजित ढेपे, प्रिती ईखार, शोभा ब्राम्हणवाडे, ज्ञानेश्र्वर शिंदे व विविध पक्षाचे पदाधिकारी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नांदगावातील रस्त्यासाठी नागरिक एकवटले
By admin | Updated: July 13, 2016 01:19 IST