अमरावती : एका बंद घराला निशाणा बनवून घरफोडी करण्याच्या उद्देशाने आलेल्या बीड जिल्ह्यातील तीन अट्टल चोरट्यांपैकी एकाला नागरिकांनी पकडून चोप दिला. राजापेठ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सामरा नगर येथे सोमवारी रात्री ९.३० वाजता ही घटना घडली. शे. छोटू शे. दिलावर (३५, रा. बारा पींपळगाव, ता.गेवराई, जि. बीड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रानुसार, शे. छोटू हा अट्टल चोरटा आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी गाडगेनगर व राजापेठ पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. शे. छोटू हा रविवारी त्याच्या दोन साथीदारांसह घरफोडी करण्यासाठी अमरावतीत आला. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सामरा नगर येथील रहिवासी सुरज रंगराव कांगोकार (३०) यांच्या घराच्या मुख्यदाराचा कोंडा तोडून त्यांनी घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटातून त्यांनी २१ ग्रॅम सोन्याचे दागिने व ३ हजार रुपये रोख चोरली. कांगोकार यांच्या घरात चोरटे घुसल्याची बाब तेथील नागरिकांच्या निदर्शनास आली. याची भनक चोरट्यांना लागताच त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यापैकी दोन चोरटे घटनास्थळावरुन पसार होण्यास यशस्वी झाले. शे. छोटू याला पकडण्याचा प्रयत्न करीत असताना त्याने नागरीकांवर दगड भिरकावले. अखेर नागरिकांनी त्याला पकडून चोप दिल्याची माहिती तेथील प्रत्यक्षदर्शींनी दिली. घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना मिळताच चार्ली कमांडो अमित कुंटारे, विशाल थोरात, अमर कराळे, नितीन ठाकरे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी शे. छोटूला ताब्यात घेवून राजापेठ पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी पोलिसांनी शेख छोटुविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी २१ ग्रॅम सोन्याचे दागिने व तीन हजार रुपये रोख असा ऐकूण ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्याच्याकडून शहरातील घरफोडीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यातील अट्टल चोरट्याला नागरिकांचा चोप
By admin | Updated: September 2, 2014 23:24 IST