एम. एस. रेड्डी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हे नोंदवा; जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांची संदिग्ध भूमिका
अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. निलंबित अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश शासनाला द्यावे, अशी त्यांनी मागणी केली.
चित्रा वाघ यांनी ५ एप्रिलला राज्यपालांची भेट घेतली. दीपाली आत्महत्याप्रकरणी आतापर्यंत झालेला घटनाक्रम त्यांच्यासमोर ठेवला. गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक़ विनाेद शिवकुमार याचे निलंबन झाले असून, तो न्यायालयीन कोठडीत आहे. दीपाली चव्हाण गर्भवती असताना जाणूनबुजून तिला त्रास देण्यात आला. ज्यात तिचा गर्भपात झाला. ज्यामुळे तिला दोन दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागले. त्या दिवसाचे वेतन कापण्यात आले. तिचा सहा, सात महिन्यांचा पगार थांबवून तिची आर्थिक काेंडी करण्यात आली. तिला वेळोवेळी अपमानित करण्यात आले. दीपाली यांना झालेल्या त्रासाची तिने वेळोवेळी कल्पना अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांना दिलेली होती. पण, त्यांनी दुर्लक्ष केले. रेड्डी यांनी वेळीच लक्ष दिले असते तर कदाचित दीपाली आज आपल्यामध्ये असती, असे वाघ म्हणाल्या. त्यामुळे रेड्डी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हे नोंदवावा, अशी मागणी त्यांनी केली.
----------------
पोलीस अधीक्षकांची भूमिका संदिग्ध
या सर्व प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांची भूमिका संदिग्ध आहे. एवढेच नव्हे तर आरएफओ संघटनेचे तसे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी हा तपास अमरावती एसपीकडूनकाढून घेण्यात यावा. एखाद्या सक्षम आयपीएस अधिकाऱ्यांकडे तपास सोपवावा, अशा मागणीचे निवेदन राज्यपाल कोश्यारी यांना चित्रा वाघ यांनी दिले आहे.