जवळा, देऊरवाडा येथे ईश्वरचिट्ठी
फोटो - १८ एस चांदूर बाजार
चांदूर बाजार - तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींच्या १३२ प्रभागांतील ३४० जागांवर बहुतांश प्रहार व काँग्रेसचा वरचष्मा राहिला. जवळा व देऊरवाडा ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी एका जागेवर ईश्वरचिट्ठी झाली, तर शिरजगाव कसबा येथे वॉर्ड क्रमांक ३ व ५ मध्ये उमेदवाराने फेरमतमोजणीची मागणी केली होती. ३४० जागांसाठी ८१३ उमेदवार रिंगणात होते. तालुक्यातील सर्वात मोठ्या शिरजगाव बंड, करजगाव, शिरजगाव कसबा, ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायतींवर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. यात प्रहार व काँग्रेस समर्थित पॅनेलने बाजी मारली होती. शिरजगाव बंड ग्रामपंचायतीमध्ये प्रहार व काँग्रेस या दोन्ही पॅनेलने आपले वर्चस्व असल्याचा दावा केला आहे. ब्राह्मणवाडा थडी येथे नंदकिशोर वासनकर हे तालुक्यातून सर्वाधिक ४६२ मतांनी विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य (४०९) शिरजगाव बंड ग्रामपंचायतीत भास्कर हिरडे यांना मिळाले. याच ग्रामपंचायतीत नंदा प्रमोद वाकोडे अवघ्या दोन मतांनी विजयी झाल्या. जवळा ग्रामपंचायतीत केशव विधळे व देऊरवाडा येथे दिनेश वाघमारे हे ईश्वरचिठ्ठीने विजयी ठरले.