६१५८ लाभार्थी : १७५.४५ कोटी मिळणार अमरावती : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिकेने आर्थिक दुर्बल घटकांकरिता घरकुलांचा प्रस्ताव मुंबई म्हाडाकडे पाठविला होता. या प्रस्तावाला केंद्रीय समितीने मान्यता दिली. ६ हजार १५८ लाभार्थ्यांच्या घरकूल प्रस्तावाला निधी देण्यास मंजुरी मिळाली आहे. या बांधकामाकरिता केंद्र, राज्य शासनामार्फत १७५ कोटी ४५ लाखांचा निधी महापालिकेला लवकरच प्राप्त होणार आहे. महापालिकेकडून ८६० सदनिका आणि ६ हजार १५८ घरकुलांचा प्रस्ताव १४ मार्च रोजी म्हाडाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार महापालिकेच्या जागेवर १४ ठिकाणी ८६० वन बीएचके फ्लॅटसचे बांधकाम करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांच्या मालकीच्या जागेवर ६ हजार १५८ घरांचे बांधकाम देखील केले जाणार आहे. या प्रस्तावासंदर्भात १६ मार्च रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय मान्यता व सनियंत्रक समितीने दोन्ही प्रकल्पांना मान्यता दिली. त्यानंतर केंद्र शासनाच्या गृहनिर्माण, दारिद्रय निर्मूलन विभागांकडे केंद्रीय अनुदान पाठविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला. १६ मार्चला झालेल्या बैठकीत राज्यस्तरीय समितीने एकूण ५२ प्रकल्पांना मंजुरी दिली होती. १८ आर्किटेक्टसोबत सामंजस्य करारअमरावती : त्यानंतर केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीची बैठक २८ एप्रिल रोजी झाली. या बैठकीत ५२ प्रकल्पांपैकी ५ प्रकल्पांच्या नमुन्यांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये म्हाडाचे ३, सोलापूर महापालिकेचा प्रकल्प आणि अमरावती महानगरपालिकाचा ६ हजार १५८ लाभार्थ्यांचा प्रकल्प सादर करण्यात आला. या प्रस्तावाला केंद्रीय समितीने मंजुरी दिली आहे. त्यानंतर २९ एप्रिल रोजी ६ हजार १५८ लाभार्थ्यांना तांत्रिक मार्गदर्शनाखाली योजना तयार करणे आणि घरांचे बांधकाम करून घेण्यासाठी १८ आर्किटेक्टसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. ही घरे तातडीने पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रयत्नरत आहे. १७५.४५ कोटींचा निधी लवकरच केंद्र सरकार व राज्य सरकारकडून प्रत्येक घरासाठी अनुक्रमे १.५० आणि १ लाख रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. केंद्र सरकारकडून १०५.२७ कोटी आणि राज्य शासनाकडून ७०.१८ कोटी असे एकूण १७५.४५ कोटींचा निधी प्राप्त होणार आहे. हा निधी तीन टप्प्यात मिळणार असून पहिला टप्पा ४० टक्के, दुसरा टप्पा ४० टक्के आणि तिसरा टप्पा २० टक्क्यांचा राहणार आहे. लवकरच मनपामार्फत ८६० सदनिका बांधकामासंदर्भात निविदा काढण्यात येणार आहे.
घरकूल प्रस्तावांसाठी निधीला केंद्रीय समितीची मान्यता
By admin | Updated: April 30, 2016 00:10 IST