पांढरे सोने बाधित : बोंडअळी, पांढरी माशी, पातेगळने नुकसानअमरावती : यंदा पेरणीपासून समाधानकारक पाऊस असल्याने सायाबीनचे पीक उत्तम स्थितीत असताना परतीच्या पावसाने बाधित झाले आहे. ठिकठिकाणी बीटी कपाशीवर ‘मर’ (पॅराविल्ट) दोन आहेत. तर प्रतिकुल पावसामुळे किड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कपाशिवर बोंडअही, पांढरी माशी, मिलीबग सोबतच पातेगळ होत असल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.जिल्ह्यात यंदा कपाशीचे एक लाख ९३ हजार २६१ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्या तुलनेत एक लाख ८१ हजार ३९२ हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी झाली. पेरणीपासून दीड महिना कपाशीला पोषक व सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. त्यामुळे कपाशी पिकांची अधिक वाढ झाली. नंतर ७ आॅगस्टपासून पावसाचा ३५ दिवस खंड राहिला. त्यामुळे संरक्षित सिंचनाची सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांनी कपाशीला पाणी देणे सुरू केले. मात्र, १५ सप्टेंबरपासून परतीचा पाऊस सुरू झाला. तीन आठवड्यापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे वातावरणात, जमिनीत आर्द्रता वाढली व सूर्यप्रकाशाचा अभाव, सतत ढगाळ वातावरण यामुळे कपाशीवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला. ठिकठिकाणी कपाशीवर आकस्मिक ‘मर’ रोगाचे आक्रमण झाले आहे. प्रतिकूल वातावरणामुळे कपाशीची पातेगळ होत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. कृषी विभाग, डॉ.पंजाबराव देशामुख कृषी विद्यापीठांतर्गत प्रादेशिक संशोधन केंद्र व कृषी अनुसंधान केंद्राच्या अधिकारी व शास्त्रज्ञांनी जिल्ह्याच्या अनेक भागात दौरा करून हे निरीक्षण नोंदविले आहे. कपाशीवर मर, पातेगळ, पांढरी माशी, तुडतुडे व फुल किड्यांचा प्रादुर्भाव झालेला आहे.कपाशीच्या पानातील रस शोषण केल्यामुळे पाने कोकडून जाऊन झाडे लाल होत आहे. अतिपावसामुळे काही ठिकाणी कपाशीची झाडे सुकून जात आहे. जिल्ह्यात अंजनगाव तालुक्यात १२ हजार ७८ हेक्टर, अचलपूर १६ हजार २३७, चांदूरबाजार १८ हजार ९५०, धामणगाव २० हजार ३६१, धारणी ६ हजार ७२०, चिखलदरा ७३१, अमरावती ६ हजार ९६८, भातकुली ५ हजार ५२३, नांदगाव खंडेश्वर ३ हजार ६४३, चांदूररेल्वे ६ हजार ११८, तिवसा १३ हजार ८३१, मोर्शी २२ हजार २५३, वरुड २६ हजार ७१७ व दर्यापूर तालुक्यात १७ हजार ४४२ हेक्टर क्षेत्रात कपाशी आहे. (प्रतिनिधी)
कपाशीवर आकस्मिक ‘मर’
By admin | Updated: October 7, 2016 00:34 IST