निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना उघड, एकदरा खैरगाव जोडणारा मार्ग बंद, शेतकऱ्याची कामे प्रलंबित
वरूड : तालुक्यातील एकदरा ते खैरगाव जोडणाऱ्या सदावर्ती नदीवरील पुलाची कडा वाहून गेल्याने मार्ग बंद झाला आहे. यामुळे एकदरा, आमपेंड, भैयापूर, खैरगाव आणि गणेशपूरच्या शेतात जाणारा मार्ग थांबला. यामुळे शेतकामांना ब्रेक लागला आहे.
नऊ महिन्यांपूर्वी बांधकाम झालेल्या पुलावरील निकृष्ट कामामुळे हा प्रकार घडल्याची लेखी तक्रार बांधकाम विभागाला शेतकऱ्यांनी दिली व कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली आहे. रास्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणीही कार्यकारी अभियंत्यांकडे करण्यात आली आहे. तालुक्यातील एकदरा, आमपेंड, भैयापूर, खैरगाव, गणेशपूर या गावांना जोडणारा पूल नऊ महिन्यांपूर्वीच जानेवारीमध्ये पंकज मालपे या कंत्राटदाराकडून बांधून पूर्ण झाला. सदावर्ती नदीवरील पुलाच्या दोन्ही टोकावर भरती टाकताना निकृष्ट साहित्य वापरण्यात आले, तर दोन्ही बाजूने सुरक्षा कठडे नाहीत. पावसाळ्यात चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुलाचा आजूबाजूचा भाग पुरामुळे खरडून गेल्याने वाहतूक बंद झाली. शेतकऱ्यांना शेतात जाण्यास मार्ग नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागतो. नऊ महिन्यातच निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना पाहावयास मिळत असून, वाहतूक पूर्णतः बंद झाली. अधिकाऱ्यासह ठेकेदारावर कारवाई करावी, अन्यथा धरणे अंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. निवेदन देताना मोहन वडस्कर, रवींद्र कोल्हे, विजय कोल्हे, शिवानी कोल्हे, लीलाधर हिवसे, मुरलीधर राऊत, राजू सुरजुसे, बंडू सुरजुसे, पांडुरंग राऊत आदी उपस्थित होते.