गणेश वासनिक - अमरावतीआघाडी, महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात पोहोचल्याने इच्छुक उमेदवारांचा जीव भांड्यात पडला आहे. मात्र, अमूक जातीचे प्राबल्य असलेले मतदान कसे गोठविता येईल यासाठी त्याच समाजातील उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभा करण्याची खेळी प्रतिस्पर्ध्यांकडून सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत उमेदवारांची गर्दी होण्याचे चित्र आहे.आठ दिवसांपासून युती आघाडीतील नेत्यांमध्ये जागावाटपावरून चर्चेचे गुऱ्हाळ चालले आहे. मंगळवारी उशिरा रात्री महायुती कायम ठेवण्यावर शिक्कामोर्तब केला. काँग्रेस, राष्ट्रवादीची अधिकृत घोषणासुद्धा होऊन उद्या २५ सप्टेंबरपासून आघाडीचे उमेदवार नामांकन अर्ज दाखल करतील, अशी माहिती काँग्रेसच्या गोटातून मिळाली आहे. आघाडी, महायुती झाल्यानंतर बसप, रिपाइं, सपा, भारिप-बमसं, भाकप-माकप या पक्षांनीसुद्धा उमेदवार उभे करण्याची तयारी चालविली आहे. बसपने विधानसभा निवडणुकीत राज्यात खाते उघडण्यासाठी रणनीती आखली आहे. आघाडी, महायुतीने तिकीट नाकारलेल्या इच्छुक उमेदवाराला बसपच्या 'हत्ती'वर स्वार करण्यासाठी राज्याचे नेते चाचपणी करीत आहेत. तर दुसरीकडे आघाडी, महायुतीत रिंगणात राहणाऱ्या उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यांची मते गोठविण्यासाठी खेळी सुरू केल्याचे चित्र आहे. ज्या समाजाच्या मतांमुळे विधानसभा निवडणुकीत विजयाची आडकाठी येणार हे लक्षात आल्याने त्याच समाजाचे एक नव्हे, तर दोन-तीन उमेदवार रिंगणात उतरवून त्या समाजाच्या मतांची विभागणी करण्यावर भर दिला जात आहे. प्रामुख्याने दलित, मुस्लिमांची मते कसे विभागली जाईल, याकडे महायुती, आघाडीतील उमेदवारांनी नियोजन आखले आहे. ही परिस्थिती जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत निर्माण होणार आहे. अमरावती मतदारसंघात प्रामुख्याने मराठा आणि मुस्लिम समाजाच्या उमेदवारांची संख्या अधिक राहावी, त्याअनुषंगाने प्रस्थापित उमेदवारांनी राजकीय खेळी केली आहे. आठ दिवसांपासूनच संबंधित उमेदवाराला रसदसुद्धा पोहोचविण्यात आल्याची माहिती आहे. काही उमेदवारांनी नामांकन दाखल करण्यापूर्वीच मतदारांच्या भेटीगाठी, बैठका, संवाद साधून आपली उमेदवारी कशी सक्षम आहे हे पटवून देण्याचा फंडा चालविला आहे. मतदारसंघात सर्वाधिक मतदारसंख्या आहे, त्याच समाजातील जास्त उमेदवार मैदानात उभे करून मतांचे विभाजन करण्यासाठी पडद्याआड 'डिलिंग' झाल्याची माहिती आहे. अमरावती मतदारसंघात मुस्लिम मतदारांची विभागणी करण्यासाठी थेट मुंबईहून सूत्रे हलल्याची माहिती आहे. ही मते एका उमेदवाराच्या बाजूने जाऊ नये याकरिता विरोधकांनी थेट मुंबई येथील एका नेत्याला हाताशी धरून चार ते पाच मुस्लिम समाजाचे उमेदवार उभे करुन मतांचे विभाजन करण्याची शक्कल लढविली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या मतांचे विभाजन करून महायुतीचे उमेदवार कसे निवडून येतील यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे.
मते गोठविण्यासाठी होणार उमेदवारांची गर्दी
By admin | Updated: September 24, 2014 23:24 IST