अमरावतीत पहिलाच प्रयोग : वळण लावण्यासाठी पोलीस आयुक्तांचे प्रयत्नअमरावती : वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्यावर तसेच पोलिसांच्या कामचुकारपणाकडे लक्ष ठेवण्यासाठी सोमवारपासून शहरातील वाहतूक कारवाईचे चित्रिकरण करण्यास सुरुवात झाली आहे. वाहतुकीला वळण लावण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी हा अभिनव प्रयोग प्रथमच अमरावतीत राबविला आहे. शहरातील अस्तव्यस्त वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शहरातील ३९ ठिकाणी पोलीस तैनात असतानाही नागरिक सर्रास वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करताना आढळून आले आहे. अनेकदा पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी शहरातील वाहतुकीचा आढावा घेतला आहे. त्यामध्ये नागरिक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करताना आढळून आले आहे. हजारो नागरिक दररोज वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करीत असतानाही वाहतूक पोलिसांच्या कारवाया कमी असल्याचे पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच कारवाईच्या आकडेवारीवरून पोलिसांनी ५२ वाहतूक पोलिसांना कारणे दाखवा नोटीससुध्दा बजावली आहे. या अस्तव्यस्त वाहतुकीवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे. मात्र, कर्तव्यावर असणारे काही पोलीस वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी कर्तव्यदक्षतेने पार पडत नसल्याचे पोलीस आयुक्तांच्या लक्षात आले आहे. अशाप्रकारच्या वाहतुकीबाबत पोलीस आयुक्त समाधानी नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता इनकॅमेऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवणे तसेच पोलीस कारवाईचीसुध्दा चित्रिकरण करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला आहे. त्याकरिता शहरातील विविध ठिकाणी आठ दिवस इनकॅमेरा वाहतुकीवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. त्याकरिता सात पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्यासोबत चित्रिकरण करणारे सात पोलीस कर्मचारी सज्ज राहणार आहेत. सोमवारपासून इनकॅमेरा वाहतुकीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात झाली असून सिग्नल अथवा अन्य ठिकाणी ये-जा करणाऱ्या वाहनांची व्हिडिओ शूटिंग करण्यास सुरुवात झाली आहे. आठ दिवसानंतर पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर वाहतुकीच्या व्हिडीओ शूटिंगचा आढावा घेणार आहे. त्यानंतर वाहतूक नियंत्रणाबाबत मोठ्या प्रमाणात फेरबदल होण्याची शक्यता आहे. वाहतूक सुरळीत व सुरक्षित व्हावी या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लघंन अधिक असतानाही कारवाई कमी आहेत. त्यामुळे आता इनकॅमेरा वाहतुकीचा आढावा घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येईल. - राजकुमार व्हटकर, पोलीस आयुक्त.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कॅमेऱ्याची नजर
By admin | Updated: October 27, 2015 00:28 IST