अमरावती : जिल्हा परिषदेंतर्गत शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर पुरविण्यात येणारी सौर कंदील योजना सध्या लालफितशाहीत अडकली आहे. त्यामुळे ६० लक्ष रुपयांचा निधी मार्चपर्यंत खर्च होणार की नाही?, हा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्य शासनाने सौर कंदील खरेदीसाठी औरंगाबाद येथील एकाच खासगी कंपनीशी करार केल्यामुळे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी या एकल धोरणामुळे हतबल झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी जिल्हा निधीतून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर सौर कंदील पुरविण्यात येतात. मात्र, जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातून तरतूद केल्यानंतर राज्य शासनाने सौर कंदील खरेदीसाठी ज्या कंपनीशी करार केला आहे, त्या कंपनीकडून दर्जेदार सौर कंदीलांचा पुरवठा केला जात नाही. परिणामी जि.प.ने दोन वर्षांपासून ६० लक्ष रुपयांची तरतूद केल्यानंतरही केवळ एकाच कंपनीसोबत करार असल्यामुळे सौर कंदील खरेदी करण्यास जिल्हा परिषदेचे पदाधिकारी उत्सुक नाहीत.परिणामी समाधानकारक सौर कंदीलांचा पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांचा रोष वाढतो आहे. शासनाने वरिष्ठ पातळीवरुन साहित्य खरेदीसाठी एकाच कंपनीची निवड केल्यामुळे सन २०१३-१४ आणि २०१४-१५ मधील जिल्हा परिषदेतील सौर कंदीलांची सुमारे ६० लाख रुपयांची खरेदी लालफितशाही अडकून पडली आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याची ही योजना आर्थिक वर्ष संपत आले असतानाही पदरात पाडून घेता येत नाही. या संदर्भात जि.प.चे माजी कृषी सभापती महेंद्र गैलवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना जि.प.मार्फत साहित्य पुरवठा करायचा असेल तर नवीन धोरण ठरविण्यासंदर्भात अध्यक्षांशी चर्चा केल्याचे सांगितले. त्यामुळे आता १४ जानेवारी रोजी जि.प.च्या विशेष सर्वसाधारण सभेत या मुद्यावर सभागृह काय भूमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
दोन वर्षांपासून रखडली सौर कंदील खरेदी
By admin | Updated: January 7, 2015 22:45 IST