मुंबईच्या वाऱ्यांमध्येच खूश : जनता म्हणते, विकासात्मक कामे दाखवा संदीप मानकर अमरावतीदर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आ. रमेश बुंदिले यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आला असला तरी आतापर्यंत त्यांना शासनाचा विशेष निधी कसा खेचून आणावा, हे कळलेच नाही. आमदारनिधी व्यतिरिक्त ते कोणताही निधी खेचून आणू शकले नाहीत. त्यामुळे मतदारसंघातील जनता विकासापासून कोसो दूर असल्याचे वास्तव आहे. आ. बुंदिले यांनी विधानसभा निवडणूक प्रचारदरम्यान जाहिरनामा प्रसिद्ध केला तेव्हा दर्यापूरची संत गाडगेबाबा सहकारी सुतगिरणी सुरु करण्याचे अभिवचन दिले होते. तसेच अंजनगाव येथील अंबा सहकारी साखर कारखाना सुरु करेन, दर्यापूर तालुक्यात अनेक उद्योगांना चालना देणार, चंद्रभागा नदीवरील लहान पूलाचे बांधकाम करणार, तालुक्यातील युवकांना रोजगार देणार आदी अनेक आश्वासने दिली होती. मागील दोन वर्षांत त्यांच्या कारकिर्दीत एकही प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे आ. बुंदिले यांना निवडून देऊन चूक तर नाही केली नाही ना, असा संभ्रम मतदारांमध्ये निर्माण होऊ लागला आहे. आ. रमेश बुंदिले वीज वितरण कंपनीत पुणे येथून मुख्य अभियंता यापदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी दर्यापूर मतदारसंघात यापूर्वी कोणतीच समाजसेवा केली नाही किंवा कोणत्याही जनआंदोलनात त्यांचा सहभाग नाही. त्यांची ओळख ते मूळ अंजनगाव तालुक्यातील भंडारज येथील रहिवासी एवढीच त्यांची ओळक. परंतु दर्यापूर विधानसभा मतदारसंघाची भाजपची उमेदवारी जाहीर होईपर्यंत हे रमेश बुंदिले कोण?, हेसुद्धा मतदारसंघातील अनेकांना माहित नव्हते. आमदार होऊन दोन वर्षे झाल्यानंतरही आ. बुंदिलेंना अनेकांनी पाहिले नाही किंवा त्यांना ते भेटले नाहीत. नरेंद्र मोदींच्या प्रभावामुळे ते १२ दिवसांत दर्यापूर- अंजनगावचे आमदार झालेत. दर्यापूरचे माजी आमदार तथा अकोटचे विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांचा आ. बुंदिलेंना भाजपची उमेदवारी मिळवून देण्यात सिंहाचा वाटा आहे. भारसाकळे यांचा दर्यापूर हा बालेकिल्ला आहे. त्यांनी या भागात २० वर्षांमध्ये प्रवाहित केलेली विकासगंगा पाहून त्यांच्या शब्दावर लोकांनी बुंदिलेंना निवडून दिले. परंतु आ. बुंदिले मात्र दोन वर्षांत एकदाही मतदारांच्या अपेक्षांवर खरे उतरले नाहीत. अधिकाऱ्यांवर कुठलाही वचक नाहीदर्यापूर तालुक्यात अवैध धंदे बोकाळले आहेत. खुलेआम अवैध धंदे सुरु आहेत. रेती तस्करी खुलेआम सुरू आहे. पण आ. बुंदिलेंचा शहरातील विविध कार्यलयातील अधिकाऱ्यांवर कुठलाही वचक राहिलेला नाही. त्यांचे अधिकाऱ्यांना अभय का? अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. मागील वर्षांची वार्षिक आमसभाही फारशी गाजली नाही. ते खुद्द वीज वितरण कंपनीचे अधिकारी राहिले असूनही शेतकऱ्यांना कृषीपंपांच्या वीज जोडणीसाठी भटकावे लागत आहे. आ. बुंदिले हितसंबंध जोपासण्यातच वेळ घालवित असतील तर शेतकऱ्यांच्या न्यायाचे काय? तालुक्यातील विद्युत उपकेंद्राचे काय? आ. बुंदिले हे वीज वितरण कंपनीत मुख्य अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेत. सेवेत असताना विजेच्या संदर्भातील अनेक कामे मार्गी लावल्याचे ते सांगतात. परंतु राजकीय आखाडयात मात्र ते अपयशी ठरले आहेत. त्यांनी दर्यापुरात व अंजनगावसाठी दोन-दोन सबस्टेशन मंजूर करून घेतले. मात्र, अद्याप त्या उपकेंद्रांच्या कामाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी विद्युतजोडण्या अद्यापही मिळाल्या नाहीत. बुंदिलेंच्या मर्जीतील ज्या कंत्राटदराला हे काम देण्यात आले, त्याने काम सोडून पळ काढल्याने विद्युत उपकेंद्र कधी साकारणार हा प्रश्नच आहे. विकासात्मक कामे करणे एवढे सोपे नाही. मंजूर विद्युत उपकेंद्रांची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील. गावकरी जमिनी देत नाहीत. त्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे पत्र दिले आहे. त्याचे डिपॉझिट जप्त करण्यात आले असून त्याच्याशी माझा काहीही संबध नाही. ३५ कोटींची विकासात्मक कामे मंजूर करुन आणली आहेत. - रमेश बुंदिले, आमदार, दर्यापूर मतदारसंघविकास शून्य आहे. सामाजिक दायित्व कुठलेच नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने विकासाची कामे नाही. आमदार निधीचीही कामे केली नाहीत. राज्यमार्गांची कामे झाली पण त्या निधीशी त्यांचा काही संबंध नाही. - बळवंत वानखडे, तालुका अध्यक्ष, रिपाई. बाभळीच्या लहान पुलाचा प्रस्ताव रखडला बाभळीच्या लहान पूलाखाली ३० वर्षात अनेक नागरिकांचे बळी गेले आहेत. म्हणून हा पूल तोडून मोठा करावा, अशी बाभळीवासियांची मागणी आहे. त्यामुळे नगरपालिकेने हा पूल बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला ना- हरकत प्रमाणपत्र दिले आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग दर्यापूर यांनी पुलाच्या बांधकामाचा प्रस्ताव तयार करुन कार्यकारी अभियंता अमरावती यांच्याकडे पाठविला आहे. पण, या प्रस्तावाचे फाईल येथे अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. हा पूल बांधण्यासाठी निधी खेचून आणणे, ही लोकप्रतिनिधी म्हणून आ.बुंदिले यांची नैतिक जबाबदारी आहे. पण, या पुलाच्या प्रस्तावाचे फाईल आमदार पुढे नेऊ शकले नाही, ही या मतदारसंघाची शोकांतिका आहे.
बुंदिलेंच्या कारकिर्दीत विकासाची लागली वाट
By admin | Updated: June 23, 2016 00:10 IST