साहिलच्या बहिणींचा टाहो : परत ये ना रे साहिल !अमरावती : ‘आई.. ताई.. मी येतो गं..’ नेहमीप्रमाणे 'त्या' दिवशीही पहाटे त्याने घाईघाईने हात हलवला. पण, ‘येतो’ सांगून गेलेला साहिल आलाच नाही! शनिवारी सगळीकडे रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा होईल. एव्हाना सर्वत्र रक्षाबंधनाची लगबग सुरू झाली देखील. माहुली जहांगिर या गावात मात्र चार बहिणींच्या डोळ्यात आहे ती अविरत प्रतीक्षा. त्यांच्या लाडक्या बंधुरायाच्या आवडीची राखी हाती घेऊन चारही बहिणींनी साहिल गेला त्या वाटेवर नजरा आच्छादल्या आहेत. बारावीत शिकणारी प्रतीक्षा, सहाव्या इयत्तेतील समीक्षा, तिसऱ्या इयत्तेतील आकांक्षा आणि के.जी.-२ मधील श्रावणीचा साहिलच्या जाण्यावर आजही विश्वास बसत नाही. या चारही बहिणींचा सर्वाधिक लाडका भाऊ होता तो. साहिलच्या समंजस स्वभावाचा आणि तल्लख बुद्धिमत्तेचा सर्वच बहिणींना अभिमान होता. हक्काने भांडणारा, रूसणारा आणि तितक्याच मायेने काळजी घेणारा साहिल त्याच्या या चारही बहिणींना राखी पौर्णिमेला हवा आहे. तोे असा एकाएकी निघून जाईल याची कुणी कधी कल्पनाही केलेली नव्हती. परंतु काळ बनून आलेल्या एसटीने त्याला ऐन राखी पौर्णिमेच्या तोंडावर असे हिरावून नेले. साहिलसाठी सारा गाव संतापला. मग, ज्या बहिणींनी दरवर्षी त्याच्या मनगटावर प्रेमाचा बंध बांधला, त्यांची काय अवस्था असेल? काही क्षणांसाठीच का होईना; पण आमचा भाऊ आम्हाला परत द्या, अशी या बहिणींनी देवाला घातलेली साद पाषाणालाही पाझर फोडणारी आहे. (प्रतिनिधी)
बंधुराया, राखी न बांधताच कसा रे गेला तू ?
By admin | Updated: August 29, 2015 00:22 IST