खडसे कुटुंबाचा टाहो : जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारअमरावती : जागेच्या वादातून बेदम मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून ज्योती खडसे यांनी केली आहे. २२ आॅक्टोबर रोजी धम्म प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम सुरू असताना बेदम मारहाण केल्याचे ज्योती खडसे यांनी म्हटले आहे. अर्जुननगरातील टेलिफोन कॉलनीनजीक महापालिकेच्या खुल्या मैदानावर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी येथे गाडगेनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारीही तैनात होते. कार्यक्रमादरम्यान स्वत:च्या मालकीच्या जागेवर बुध्दविहार बांधण्यासंदर्भात ज्योती यांचे पती जयकृष्ण खडसे यांनी विरोध दर्शविला. त्यामुळे अशोक मेश्राम यांनी जयकृष्ण खडसे यांच्यासह कुटुंबीयांना मारहाण केल्याचे ज्योती खडसे यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर नागदेव गडलिंग, संगिता मेश्राम, रूपाली मेश्राम, निरंजन गोसावी, अर्चना गोस्वावी, अवधूत मकेश्र्वर, त्रिवेणी मकेश्र्वर विनायक रामटेके, रंजना गोवर्धन, कमलाकर गोवर्धन, कैलास पाटील, बेबी वहाणे, अवधुर मनोहरे, सुषमा रामटेके, अशोक झटाले आदींनीही मारहाण केल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्यावतीने खडसे दाम्पत्याविरूध्द गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. या तक्रारीची शहानिशा न करता गुन्हा नोंदविल्याचे ज्योती खडसे यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
कुटुंबाला बेदम मारहाण, कारवाईची मागणी
By admin | Updated: October 27, 2015 00:23 IST