आदेश : खासगी शाळांचा जीव भांड्यातअमरावती : शैक्षणिक पुनर्रचना मोहिमेंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील चौथीच्या वर्गाला पाचवी आणि सातवीच्या वर्गाला आठवीचा वर्ग जोडण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु या आदेशाला शिक्षक संघटनांनी विरोध केल्याने जिल्ह्यातील केवळ ३० ते ४० टक्के शाळांमध्येच चौथीच्या वर्गाला पाचवीचे आणि सातवीच्या वर्गाला आठवीचे वर्ग जोडले गेले आहेत. त्यामुळे शैक्षणिक पुनर्रचना मोहिमेला ब्रेक लागला. शासनाने पहिली ते पाचवीला प्राथमिक शिक्षणाचा सहावी ते आठवीला उच्च प्राथमिक शिक्षणाचा नववी व दहावीला माध्यमिक शिक्षणाचा तर अकरावी व बारावीला उच्च माध्यमिक शिक्षणाचा दर्जा देत शैक्षणिक पुनर्रचना केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळेत चौथीपर्यंत आहेत त्यात पाचवीचा व ज्यात सातवीपर्यंतचे वर्ग आहेत त्याला आठवीचा वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले होते. चौथी व सातवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्यात येऊ नये, अशा सूचना दिल्या होत्या. या निर्णयाला काही शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला होता. जिल्हा परिषद, महापालिका व नगरपालिकेच्या शाळात पाचवी व आठवीचे वर्ग सुरू झाले तर अनुदानित शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका संघटनांनी व्यक्त केला होता. त्यानंतर शासनाने पुन्हा एक परिपत्रक काढले आहे. त्यात म्हटले आहे की, शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांनी कोणत्या शाळेत शिक्षण घ्यावे हे ठरविण्याचा अधिकार पालकांचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा सोडल्याचा दाखला मागितला तर शाळेला तो रोखून ठेवता येणार नाही, असे स्पष्ट केले होते. हे परिपत्रक काढून शासनाने याप्रकारे विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला अडविण्याची सक्ती करण्यात येऊ नये, अशी सूचना केली होती. परिणामी जिल्ह्यातील बोटावर मोजण्या इतक्या शाळांमध्येच चौथीपर्यंतच्या शाळेत पाचवीला व सातवीपर्यंतच्या शाळेत आठवीचा वर्ग सुरू करण्याचे काम झाले आहे. दुसरीकडे एप्रिल महिन्यात शासन आदेश आल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या आदेशाची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू केली होती. (प्रतिनिधी)विषय शिक्षकांची पदे रिक्तजिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पाचवी आणि आठवीचे वर्ग सुरू झाल्यास विषय शिक्षकांची पदे भरावी लागतील. सद्यस्थितीत जिल्हा परिषदेच्या शाळेत विषय शिक्षकांची पदे रिक्त आहेत, तर दुसरीकडे पदवीधर शिक्षकांना पदोन्नतीची प्रतीक्षा आहे.-तर स्थिती गंभीरमाध्यमिक शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांची संख्या बरीच आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पाचवी आणि आठवीचे वर्ग सुरू झाले, तर माध्यमिक शाळांमधील अनेक तुकड्या बंद होतील. तसे झाले तर प्रत्येक शाळेत दोनपेक्षा अधिक शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका आहे.इयत्ता चौथीपर्यंतच्या शाळांमध्ये पाचवीचे व सातवीपर्यंतच्या शाळांत आठवीचे वर्ग सुरू करण्याची सक्ती शासनाने केली होती. परंतु आरटीईनुसार पालकांनी आपल्या पाल्यांना कोणत्या शाळेत शिकवावे, याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी राहतील. म्हणून नवीन वर्ग सुरू करण्यास अडचणी आलेल्या आहेत.- एस. एम. पानझाडे,शिक्षणाधिकारी प्राथमिक
शैक्षणिक पुनर्रचना मोहिमेला ब्रेक, शाळांना दिलासा
By admin | Updated: June 28, 2016 00:14 IST