पोलीस ठाणे होऊनही दुर्लक्ष : सागवान तस्करी, वरली-मटका, दारूविक्री जोरात विलास खाजोने ब्राह्मणवाडा महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील ब्राह्मणवाडा थडी हे गाव अवैध धंद्यांचे माहेरघर बनले आहे. येथे मोठ्या प्रमाणात गावठी दारू व सागवान तस्करीचे प्रकार सुरू आहेत. येथे नवे पोलीस ठाणे होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र, अवैध धंद्यांवर कोणताही अंकुश लागू शकलेला नाही. त्यामुळे सामान्य जनतेचा मात्र भ्रमनिरास झाला आहे. मध्य प्रदेशातील सातपुड्याच्या पर्वतराजीतून येथे मोठ्या प्रमाणात कत्तल करून सागवान आणले आहे. दुचाकी तसेच इतर वाहनांद्वारे हे लाकूड आणून त्याचे फर्निचर बनवून विक्री केली जाते. आदिवासींकडून ४०० ते ५०० रूपयांमध्ये सागवानाचे एक कांडे विकत घेऊन त्यांची चक्क ८०० ते १ हजार रूपये दराने विक्री केली जाते. दिवसाढवळ्या दुचाकींवर ६ ते १० सागवानाचे लाकूड आडवे टाकून सर्रास वाहतूक करताना दिसून येते. गावात वरली-मटक्याच्या व्यवसायाला ऊत आला आहे. भर बाजारात चौकाचौकांत वरलीची दुकाने उघडलेली दिसून येतात. याठिकाणी अनेक लोक जमलेले असतात. पोलिसांच्या नाकावर टिच्चून हा प्रकार सुरू असतानासुध्दा त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. गावठी दारू व देशीदारू विक्रीबाबतही थोड्याफार फरकाने हाच प्रकार दिसून येतो. प्लास्टिक पन्नीमध्ये गावठी दारू मध्य प्रदेशातील एनखेडी, दाभोना आदी गावांतून ब्राह्मणवाडा येथे आणली जाते आणि बिनदिक्कतपणे त्यांची विक्री केली जाते. येथे देशी दारूचे चिल्लर विक्री दुकान आहे.या दुकानातून विश्रोळी, नागरवाडी, बेलखेडा, परसोडा आदी गावांमध्ये दारूचा पुरवठा केला जातो. ब्राह्मणवाडा थडी येथेसुध्दा अनेक ठिकाणी देशी दारू विकत मिळते. मात्र, पोलीस मात्र हातावर हात देऊन बसत असल्याचे चित्र आहे.
पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष-वासनकरब्राह्मणवाडा थडी येथे पोलीस ठाणे होऊन अडीच महिने झाले आहेत. मात्र, अवैध धंद्यांवर कोणताच परिणाम झालेला नाही. उलट हे धंदे पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहेत. वरली-मटका, सागवान तस्करी, अवैध गावठी व देशी दारू विक्री राजरोसपणे सुरू आहे. प्रत्यक्षात पोलिसांनी जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या अवैध व्यवसायांवर अंकुश लावण्याची गरज आहे. परंतु पोलीस प्रशासनाने शांतता कमिटीची अद्याप एकही बैठक घेतलेली नाही, अशा शब्दांत ब्राह्मणवाडा थडी येथील सरपंच व चांदूर येथील बाजार समितीचे सभापती नंदकिशोर वासनकर यांनी सांगितले. अवैध दारु व्यावसायिकांवर कारवाईची मागणीअलीकडे तरूणांमध्ये दारूचे व्यसन वाढले आहे. गावातच सहजरीत्या दारू उपलब्ध होत असल्याने तरूण अधिकच व्यसनाधीन होत आहेत. यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. मद्यपींमुळे महिलांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या अवैध व्यावसायिकांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी आधार महिला सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष वर्षा गवई यांनी केली.