मसानगंज येथील घटना : अग्निशमन दलासह पोलिसांना पाचारण अमरावती : गाळ उपसण्याकरिता विहिरीत उतरलेल्या सख्ख्या मावस भावंडांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मसानगंज येथील सार्वजनिक विहिरीत घडली. प्रवीण भारत आठवले (३५) व बाबूलाल अभिमान वानखडे (३७, दोन्ही राहणार शेलू, ता.नांदगाव खंडेश्वर) अशी मृतांची नावे आहेत. घटनेनंतर अग्निशमन दलासह पोलिसांना पाचारण करण्यात आले. अथक परिश्रमानंतर विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.पावसाळ्यापूर्वी शहरातील सार्वजनिक विहिरींच्या साफसफाईचे काम महापालिकेकडून सुरु करण्यात आले आहे. शहरातील काही विहिरींमधील गाळ उपसण्याचे कंत्राट गजानन किसन रोतळे (४०, रा. कुंभारवाडा) यांच्याकडे होते. त्यांच्यासोबत प्रवीण आठवले, बाबूलाल वानखडे, सुरेश शंकर घुले व संदीप प्रल्हाद सावंत हे देखील काम करीत होते. मंगळवारी कंत्राटदार गजानन रोतळे व कामगारांनी सकाळी ९ वाजता गवळीपुऱ्यातील विहिरीची साफसफाई केली. त्यानंतर ते मसानगंज परिसरातील साहू मंगल कार्यालयानजीकच्या सार्वजनिक विहिरीचा उपसा करण्याकरीता गेले. त्यांनी सकाळी १० वाजता विहिरीतील कचरा स्वच्छ करण्याचे काम सुरु केले होते. सर्वप्रथम प्रवीण आठवले व बाबूलाल वानखडे हे दोघे विहिरीतील कचरा काढण्याकरिता आत उतरले होते तर गजानन रोतळे व सुरेश घुले आणि संदीप सावंत बाहेर कचरा गोळा करण्यासाठी उभे होते. सर्वांनी अर्धातास विहिरीतील गाळ काढला. त्यानंतर थोडी विश्रांती घेतली. त्यानंतर पुन्हा गाळ काढण्यास सुरूवात केली. मात्र, गाळ काढता-काढता अचानक प्रवीण आठवलेचा श्वास गुदमरू लागला. त्याने अन्य साथीदारांना मदतीसाठी हाक दिली. त्यानंतर तोे बेशुध्द होऊन विहिरीतील घाण पाण्यात कोसळला. हे लक्षात येताच बाबूलाल वानखडेने प्रवीणला वाचविण्याचा प्रयत्न केला. तो देखील विहिरीच्या पाण्यात उतरला.विषारी गॅसमुळे मृत्यूअनेक वर्षांपासून या विहिरीतील पाण्याचा उपसा बंद होता. त्यात परिसरातील नागरिक कचरा, निर्माल्य व गणपती शिरवीत होते. यामुळे विहिरीत विषारी गॅस तयार झाला असावा. त्या गॅसमुळेच कामगारांचा श्वास गुदमरुन मृत्यू झाल्याची चर्चा होती. विहिरीचे पाणी बऱ्याच दिवसांपासून वापरात नव्हते. त्यामुळे ही घटना घडल्याची चर्चा होेती. मृत इसम सख्खे मावसभाऊप्रवीण आठवले व बाबूलाल वानखडे हे दोघेही सख्खे मावसभाऊ असून ते नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेलू गावात राहतात. दोघांनाही प्रत्येकी दोन मुले असून सद्यस्थितीत ती मुले शिक्षण घेत आहेत. उन्हाळ्यात कामाच्या शोधात असताना त्यांनी विहिरीतील गाळाचा उपसा करण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, याच कामात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अग्निशमन दलाचा कर्मचारी बेशुद्धअग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी तत्काळ स्वच्छता कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. अग्निशमन दलाचा कर्मचारी सुरेश पालवे (२२) याच्या कंबरेला दोरी बांधून विहिरीत पाठविण्यात आले. सुरेश पालवे विहिरीत अडकलेल्या एका कामगाराला दोरी बांधून बाहेर काढणार होता. मात्र,तेवढ्या वेळात तो देखील बेशुध्द झाला. ही बाब लक्षात येताच अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला तत्काळ बाहेर खेचले.
विहिरीत दोघांचा गुदमरून मृत्यू
By admin | Updated: June 1, 2016 00:39 IST