१०० पोलखोल सभा : गाडगेबाबांच्या समाधी दर्शनाने अन्नत्यागाची सांगताअमरावती: शासन दरबारी न्याय मागण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना लाठीमाराचा सामना करावा लागला. त्यांचे रक्त सांडले. ‘नांगर आंदोलन’ चिरडण्यासाठी पोलिसांनी रक्तपात केला. पोलिसांनी केलेल्या रक्तपाताचा निषेध आम्ही रक्तदानाने केला, अशी माहिती आ. बच्चू कडू यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.स्थानिक पंचवटीचौक ते जिल्हाकचेरीदरम्यान गुरुवारी प्रहारच्यावतीने काढण्यात आलेल्या नांगर मोेर्चात सहभागी शेतकऱ्यांवर विनाकारण बेछुट लाठीमार केल्याप्रकरणी आ. कडू यांनी भाजप सरकारवर ताशेरे ओढले. नोटाबंदीनंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी देशातील हे पहिले आंदोलन होते. ते चिरडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना अप्रत्यक्षपणे लाठीमार करण्याचे आदेश दिल्याचा आरोपही त्यांनी केला. शासनाने महिला व शेतकऱ्यांचे रक्त सांडले. पोलिसांच्या रक्तपाताच्या याकृतीचा निषेध रक्तदान करून नोंदविल्याने तरी शासनाचे डोळे उघडतील, असे आ. कडू म्हणाले. भाजप सरकार हे शेतकरीविरोधी असून आता ठिकठिकाणी शासनाची पोलखोल करणाऱ्या १०० सभा घेऊन सरकारच्या नाकी नऊ आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आचारसंहिता असल्यामुळे अधिक आक्रमक होणार नाही. परंतु लाठीमाराचा हिशेब पोलिसांकडून घेणारच, असे त्यांनी सांगितले. शुक्रवारी अन्नत्याग आंदोलनाची सांगता करताना आयोजित रक्तदान उपक्रमात ५१ जणांनी रक्तदान केले. जिल्हाकचेरी ते गाडगेबाबा समाधीस्थळापर्यंत पायी रॅली काढून आमचे काय चुकले, हे गाडगेबाबांपुढे नतमस्तक होऊन विचारणार असल्याचेही आ.कडू म्हणाले. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाबाबत जनजागृतीसाठी पहिली सभा नजीकच्या कठोरा येथे तर दुसरी सभा नया अकोला येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रहार कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखलअमरावती : अन्नत्याग आंदोलनात गुरुवारी रात्री आ. यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप, काँग्रेसच्या नेत्या पुष्पाताई बोंडे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. शुक्रवारी नवनीत राणा, बबलू शेखावत, दिनेश बूब, सोमेश्वर पुसतकर आदींनी आ. कडुंची भेट घेतली.‘प्रहार’ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल : प्रहार पक्षाच्या ३५० ते ४०० कार्यकर्त्यांवर पोलिसांवर हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्यासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याकार्यकर्त्यांनी दगडफेक करून सरकारी व खासगी मालमत्तेचे नुकसान केले तथा बेकायदेशीर जमाव जमवून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका देखील त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी एपीआय फिरोज पठाण यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम १४३, १४७, १४८, १४९, ३५३,३३२, ३३३, ३३६, १८८, ३०७, ३, ४, सार्वजनिक संपत्ती नुकसान प्र. अधि. कलम १३५, १३६ मुपोका कलम ७ क्रिमीनल लॉ अमेन्टमेंटन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)सीएम ते पीएम शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध आता देशपातळीवर नोंदविला जाईल. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी नागपूर येथे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जन्मगाव असलेल्या गुजरातेमधील वडगाव असा चार हजार किमी.चा पल्ला गाठून आसूड आंदोलन केले जाईल, असे आ. कडू यांनी सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांचा सत्यपडताळणी अहवाल मुख्यमंत्र्यांकडेआ. बच्चू कडू यांच्या नांगर आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीमारप्रकरणी सत्यपडताळणी अहवाल जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. हा अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. यात जखमी मोर्चेकऱ्यांचे बयाण नोंदविले आहे. तसेच कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून वस्तुस्थिती सादर केल्याचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सांगितले.
रक्तपाताचा निषेध रक्तदानाने
By admin | Updated: January 7, 2017 00:08 IST