‘रेड्डी मुर्दाबाद’चे नारे लागले, दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी रेड्डींवर गुन्हे नोंदवून निलंबन करण्याची मागणी
अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्यावर गुन्हे नोंदवून त्यांना निलंबन करावे, या मागणीसाठी भाजपने मंगळवारी मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालयात हल्लाबोल केला. यादरम्यान रेड्डी यांच्या निलंबनासाठी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) पी. साईप्रसाद यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. तब्बल तीन तास आंदोलन चालले. अखेर रेड्डी यांच्या निलंबनाची वार्ता कळताच हे आंदोलन स्थगित झाले.
भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तायडे आदींच्या नेतृत्वात हल्लाबोल करण्यात आला. यावेळी धारणी पोलिसांच्या कोठडीत असलेला आरोपी विनोद शिवकुमार याला पंखा मिळतो, मटणाची व्यवस्था करण्यात येते, घालायला बरमुडा दिला जातो, यावरून पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांना लक्ष्य करण्यात आले. विभागीय वनअधिकारी मनोज खैरनार यांनी रेड्डी यांच्या समर्थनार्थ काही महिला अधिकारी, कर्मचारी यांना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्याकडे पाठविल्याबाबत भाजपने खैरनार यांना चांगलेच सुनावले.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी प्रभारी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण हे कार्यालयात पोहोचले. चव्हाण यांनासुद्धा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. आंदोलनात चंद्रशेखर कुळकर्णी, विनय नगरकर, अन्नू शर्मा, अर्चना मुरूमकर, अर्चना पखान, साधना म्हस्के, संगीता पाटील, श्याम गवळी आदी उपस्थित होते.