पाच पैकी तीन ठिकाणी राकाँ : दोन जागांवर काँग्रेसचा विजयधारणी : तालुक्यातील ५ पैकी ३ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस तर २ ठिकाणी काँग्रेसचा विजय झाला असून भाजप व सेनेचा पूर्णपणे सफाया झाल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने निर्णायक बहुमत प्राप्त केले असले तरी राजकुमार पटेल यांचे वडीलबंधू जयप्रकाश पटेल यांचा निसटता पराभव झाल्याने ‘गड आला पण सिंह गेला’ अशी अवस्था झाली आहे. सर्वाधिक प्रतिष्ठेच्या व पाच पैकी एकमात्र पुरूष गटाकरिता डिजिटल व्हिलेज हरिसाल गटात चुरशीची लढत झाली. काँग्रेसच्या महेंद्रसिंह गैलवार यांनी राकाँच्या जयप्रकाश पटेल यांचा अवघ्या २३७ मतांनी पराभव केला. महेंद्र गैलवार यांना ३८०६ तर जयप्रकाश पटेल यांना ३५६९ मते मिळाली. भाजपच्या तालुकाध्यक्ष सदाशिव खडके यांना १७७१ मते मिळाली. त्यांची हॅटट्रीक काँग्रेसने रोखली. दिया गटातून राकाँच्या माया मालवीय यांनी भाजपच्या अभिलाषा जैस्वाल यांचा ७०५ मतांनी पराभव केला. माया मालवीय यांना ४७२१ तर अभिलाषा जैस्वाल यांना ४०१६ मते मिळाली. येथे काँग्रेसच्या मंगा पाटील २२७७ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. दुसऱ्या सर्वात जास्त प्रतिष्ठेच्या गोंडवाडी जि.प. गटात काँग्रेसच्या वनिता श्रीपाल पाल यांनी राकाँच्या वंदना जावरकर यांचा १३०२ मतांनी पराभव केला. वनिता पाल यांना ५१४९ तर पराभूत वंदना जावरकर यांना ९८४७ मते मिळाली. भाजपच्या निशा गंगाराळे ३५७६ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिल्यात. मोगर्दा गटातून राकाँच्या तालुकाध्यक्षांच्या पत्नी सीमा घाडगे यांनी काँग्रेसच्या गंगा राजमा जावरकर यांचा ७७५ मतांनी पराभव केला. सीमा घाडगे यांना ५२१८ तर काँग्रेसच्या गंगा जावरकर यांना ४४४३ मते मिळाली.येथील हिरालाल मावस्कर यांनी काँग्रेस सोडून भाजपत पालकमंत्र्यांच्या समक्ष प्रवेश केला होता. त्यांया पत्नी पूर्वीसुद्धा जि.प.सदस्या होत्या. राणीगाव गटातून राकाँच्या सरला मावस्कर यांनी भाजपच्या नीता अरूण बेठेकर यांचा ३६५ मतांनी पराभव केला. सरला मावस्कर यांना ३९५५ तर भाजपच्या नीता बेठेकर यांना ३५९० मते मिळालीत. येथे शिवसेनेच्या सुगन पटोरकर यांना २३२५ मते घेत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावा लागला. तर काँग्रेसच्या राधा पाटील १५९५ मतांसह चवथ्या क्रमांकावर राहिल्यात. (तालुका प्रतिनिधी)
धारणीत भाजप, सेनेचा सफाया
By admin | Updated: February 24, 2017 00:21 IST