साप निघाल्यास घाबरू नका, वनविभागाच्या १९२६ हेल्पलाईनवर संपर्क साधा, सर्पमित्र येईपर्यंत सापाजवळ जाऊ नका
अमरावती : दरवर्षी पावसाळ्यात नागरी वस्तांमध्ये साप निघण्याचा घटना घडतात. परंतु, बरेचदा साप बिनविषारी असतानासुद्धा अनेक जण घाबरतात. त्यामुळे कोणताही प्रजातीचा साप निघाला, तर घाबरू नका, वन विभागाच्या १९२६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. सर्पमित्र येईपर्यंत सापाजवळ जाऊ नका, असा सल्ला सर्पमित्रांनी दिला आहे.
अमरावती जिल्ह्यातील नागरी वस्त्यांमध्ये मण्यार, नाग, घोणस, फुरसे हे चार प्रजातीचे विषारी साप प्रामुख्याने आढळतात. याशिवाय अन्य साप हे बिनविषारी असून, या सापांना घाबरण्याचे काहीही कारण नाही. कोण्याचाही घरी साप निघाल्यास त्यापासून किमानसात ते आठ फूट अंतर राखणे गरजेचे आहे. यादरम्यान सापावर बारकाईने नजर राखून ठेवावी. साप कोणत्या दिशेने हालचाली करतो, हे सर्पमित्र आल्यानंतर अचूक सांगावे, जेणेकरून सर्पमित्राला साप पकडणे सोपे होईल.
----------------
जिल्ह्यात आढळणारे विषारी साप
मण्यार - रात्रीच्या वेळी आढळतो. कीटक खाण्यासाठी पाली बाहेर पडतात आणि मण्यार या पालींना भक्ष्य करतो. तो साप, पालींना खातो.
नाग - जुन्या पडक्या घरात प्रामुख्याने नाग आढळून येतो. उंदीर, घुस नागाचे आवडते खाद्य आहेत. जुन्या, पडक्या घरातच त्यांचे वास्तव असते.
घोणस - हा साप लाकडाच्या ढिगाऱ्याखाली बसून असतो. उंदीर हे हे त्याचे खाद्य असून, सोयाबीनच्या शेतात त्याचा सतत वावर असतो.
फुरसे : हा साप विंचू खाणारा आहे. दगड अथवा पहाडी भागात त्याचे वास्तव असते. जेथे विंचूचा वावर, तेथे फुरसे साप हमखास आढळतो.
----------
जिल्ह्यात आढळणारे बिनविषारी साप
अमरावती जिल्ह्यात धामण, कवड्या, दिवड, नानेटी, धूळनागीण, बॅंन्डेड कुकरी, तस्कर, गवत्या, डुरक्या घोणस, मांडुळ आदी बिनविषारी साप आढळून येतात.
-------------
साप आढळला तर...
साप आढळला, तर सर्पमित्राला बोलावा. तेथपर्यंत सापाच्या जवळ जाऊ नका.
वनविभागाशी संपर्क साधून अधिकृत सर्पमित्राला घरी बोलवा. तेथपर्यंत लहान मुलांनी काळजी घ्यावी.
साप असलेल्या भागात किमान सात ते आठ फूट अंतर राखावे. कोणीही त्या भागात प्रवेश करू नये.
पावसाळ्यात साप हमखास निघतात. घाबरून न जाता सर्पमित्राला बोलावून सापाला पकडून नेऊ द्या.
--------
साप चावला तर....
- साप चावल्यास घाबरू नये. ज्या भागात दंश केला असेल, त्याच्या वरील भागात घट्ट कापड बांधावे.
- शासकीय रुग्णालयातच उपाचारासाठी जावे.
- बुवावाजी अथवा महाराजाकडे धाव घेऊ नये. वेळीच उपचार महत्त्वाचा आहे.
---------------
साप निघाल्यास वनविभागाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. घराचा पत्ता आणि मोबाईल क्मांक अचूक सांगावा. बिनविषारी साप चावल्यास शासकीय रुग्णालयातच उपचार घ्यावा. सापाने दंश केलेल्या वरच्या भागात घट्ट कापड अथवा दोरी बांधावी. रक्तस्राव होणार नाही, याची काळजी घ्यावी.
- नीलेश कंचनपुरे, सर्पमित्र, वसा संस्था