पान १ वर
अमरावती : रात्री १२ वाजल्यानंतर सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करताना आढळल्यास ‘बर्थ डे बॉय’ला केक लॉकअपमध्ये खावा लागणार आहे. रस्त्यावर वाढदिवस साजरा करून शस्त्राने केक कापणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. फ्रेजरपुरा पोलिसांनी अशा दोन कारवाया केल्या आहेत. अलीकडे राजापेठ पोलिसांनी डीजे वाजवून वाढदिवस साजरा करणाऱ्यांना ‘खाकी’चे दर्शन घडविले.
गल्लीबोळात तसेच सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या सुमारास मुलाचा, युवा नेत्याचा किंवा टपोरींचा वाढदिवस साजरा करण्याची प्रथा सध्या सुरू आहे. ‘भाईगिरी’ची क्रेझ असलेले युवक तलवार, चाकू, कोयता आदीने केक कट करून डीजेच्या आवाजावर थिरकून वाढदिवस साजरा करीत आहेत. यामुळे नियमांचे उल्लंघन होत असून, नागरिकांना त्रास होत असल्याने अशांवर आता कठोर फौजदारी कारवाई केली जात आहे. त्यांना अटक करून त्यांची पोलीस कोठडीत रवानगीदेखील केली जाते. त्यामुळे वाढदिवस रस्त्यावर साजरा कराल, तर खबरदार, असा इशाराच पोलिसांनी केलेल्या कारवाईतून दिला आहे.
////////////
तर गुन्हा होणार दाखल
रस्त्यावर वाहन उभे करून शस्त्राने केक कापणे.
रस्त्यावर गोंधळ घालणे.
हा प्रकार सोशल मीडियावर अपलोड करणे.
शांतता भंग करून नागरिकांमध्ये दहशत पसरवणे.
निर्धारित वेळेनंतर डीजे वाजविणे
मध्यरात्री फटाके फोडणे
/////////
अमरावती शहरात दोन गुन्हे
२५ मे २०२० च्या रात्री वाढदिवसाच्या निमित्ताने उके नामक तरुणासह आणखी काही मित्रांनी शहराच्या बिच्छुटेकडी परिसरातील राहुलनगरात एकत्र येत वाढदिवस साजरा केला. त्यांचे तलवार हातात घेऊन केक समोर उभे असल्याचे छायाचित्र समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. संचारबंदीदरम्यान अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापूर्वी जानेवारी २०१९ मध्ये काँग्रेसनगर भागातील तक्षशिला कॉलेजवळ रात्री ११ वाजता तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या पाच जणांना फ्रेजरपुरा पोलिसांनी अटक केली होती.
//////////
- तर फौजदारी कारवाईचा बडगा
तलवारीने केक कापत वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. बंदूक, तलवार किंवा अन्य शस्त्र हातात घेऊन छायाचित्र काढले जाते. हे छायाचित्र सोशल मीडियावर टाकत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. अशांवर फौजदारी कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
- डॉ. आरती सिंह, पोलीस आयुक्त, अमरावती