आश्वासन : संबंधितांवर कारवाईचे आदेश वरूड : सावंगा येथील शेतकरी घनशाम आंडे यांनी लोणी धवलगिरी प्रकल्पात सावंगा ते गोरगाव रस्ता बुडीत क्षेत्रात गेल्याने पर्यायी रस्त्यासाठी पाच वर्षांपासून संघर्ष सुरू केला. परंतु तक्रारीची दखल घेतली नव्हती. अखेर ३ नोव्हेंबरपासून लोणी धवलगिरी प्रकल्पात जलआंदोलन सुरू केले. ९८ तासांनंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांची भेट घेऊन मागणी रेटली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. शेतकरी घनशाम आंडे यांनी २ डिसेंबर २०११ ला पाटबंधारे विभागाकडे लेखी तक्रार करुन पर्यायी रस्ता आणि पूल निर्मितीची मागणी केली होती. मागणी मान्य झाली नसल्याने ओव्हफ्लोमध्ये त्यांनी उपोषण सुरू केले. ३ नोव्हेंबरला सकाळी साडेसहा वाजतादरम्यान गनिमी काव्याने प्रकल्पात प्रवेश घेऊन जलआंदोलन सुरु केले होते. तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, ठाणेदार मुकुंद ठाकरे, सिंचन अभियंता सोनारे यांनी आंदोलनकर्ते कुमार आंडे ेयांना समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु तातडीने कारवाई का करण्यात येत नाही, या विषयावर आंदोलनकर्ता ठाम होता. यांच्या जलआंदोलनाला वरीष्ठ अधिकाऱ्यांनी साधी भेटसुध्दा दिली नाही. यामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार संजय बंड, उपजिल्हाप्रमुख किशोर माहोरे, शहरप्रमुख लीलाधर बेलसरे, तालुकाप्रमुख विनोद डहाके, युवासेनेचे मदन झळके, जया नेरकर आदींनी आंदोलनकर्त्याची भेट घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन कारवाईची मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यावर प्रशासन नरमले आणि संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले.
धवलगिरी प्रकल्पातील जलआंदोलन मागे
By admin | Updated: November 8, 2015 00:20 IST