गुरूकुंज मोझरी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४६ व्या पुण्यतिथी महोत्सवाला मंगळवारी पहाटे ४.३० वाजता महासमाधीला अभिषेक करून सुरूवात झाली. संत शंकर महाराजांच्या हस्ते महासमाधीला अभिषेक करण्यात आला. सामुदायिक ध्यानानंतर संत शंकर महाराज यांनी चिंतन केले. ते म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी जगाला थोर तत्त्वज्ञान दिले. आपली ग्रामगीता शेतकऱ्याला अर्पण करून त्यांनी दिलेला आगळा संदेश चिरस्मरणीय आहे. यावेळी श्रीगुरूदेव मानवसेवा छात्रालयाच्यावतीने गुरूकुंज आश्रमातून टाळपदन्यास मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत भगव्या पताका, भगव्या टोप्या परिधान केलेले नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. टाळपदन्यास मिरवणुकीचे आकर्षणराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा पुण्यतिथी उत्सव आठवडाभर चालणार असून यामध्ये विविध कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना मिळणार आहे. श्रीगुरूदेव मानवसेवा छात्रालयाच्यावतीने संचालित टाळपदन्यास मिरवणुकीने सर्व गुुरूकुंजवासीयांचे लक्ष वेधून घेतले. बुधवार ८ आॅक्टोबर रोजी सकाळी ५.३० ते ६.३० वाजेपर्यंत गणेश धर्माळे यांचे सामुदायिक ध्यान, सकाळी सात ते ८ वाजेपर्यंत योगाचार्य कपाळे गुरूजींद्वारे संचालित योगासन व प्राणायाम शिबिर, सकाळी ८ ते ९.३० वाजताच्या दरम्यान बाबाराव पुनसे यांचे ग्रामगीता प्रवचन, सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत श्रीगुरूदेव संगीत मंदिरद्वारा संचालित खंजेरी भजन संमेलन.सायंकाळी ६ ते ७ वाजता दरम्यान सामुदायिक प्रार्थनेवर प्रभाकर गायकवाड यांचे भाषण, संध्याकाळी ७.३० ते ८.३० वाजेपर्यंत श्रीगुरूदेव आदिवासी भजन मंडळ, काजळेश्वर यांचे भजन.संध्याकाळी ८.३० ते ९.३० वाजेपर्यंत गजानन सुरकर यांचे कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. (वार्ताहर)
राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवाला थाटात सुरूवात
By admin | Updated: October 7, 2014 23:27 IST