जबाबदारी : सुनील वऱ्हाडे, नीलिमा महल्ले यांच्या नावाची घोषणाअमरावती : येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खांदेपालट करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्षपदी सुनील वऱ्हाडे तर महिला जिल्हाध्यक्षपदी नीलिमा महल्ले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. अमरावती मतदारसंघात नवनीत राणा यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भैसे यांनी पदाचा राजीनामा दिला. मात्र राष्ट्रवादीची धुरा कोणाच्या हाती सोपवावी यासाठी पक्षश्रेष्ठींना दोन महिन्यांचा कालावधी लागला. जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक नावे पुढे आल्याने पक्ष नेतृत्वापुढे पेच प्रसंग निर्माण झाला होता. अखेर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांच्यावर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी नीलिमा महल्ले यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सुनील वऱ्हाडे आणि नीलिमा महल्ले ही नावे आ. रवी राणा यांनी समोर केल्याची माहिती आहे.राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेश सचिव संजय खोडके यांनी पक्षाविरोधी बंड पुकारल्याने त्यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले आहे. यापूर्वी खोडके गटाचे राष्ट्रवादीत वर्चस्व होते. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर वेगवान हालचाली झाल्यात. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर राष्ट्रवादीत नवीन चेहऱ्यांना संधी देत पक्षबांधणीची धुरा सोपविण्यात आली आहे. सुनील वऱ्हाडे, नीलिमा महल्ले हे राष्ट्रवादीचे नवे शिलेदार ठरविण्यात आले आहे. गुरूवारी मुंबई येथील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रदेश सचिव गर्गे यांनी नव्या शिलेदारांना पदाची धुरा सोपविली; हे विशेष. शुक्रवार २५ जुलै रोजी नव्या पदाधिकाऱ्यांचे आगमन होणार आहे.
राष्ट्रवादीचे नवे शिलेदार ठरले
By admin | Updated: July 24, 2014 23:38 IST