अमरावती : विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील एका प्रशासकीय अधिकाऱ्याला मारहाण करून टेबलवरील फाईलची फेकाफेक केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.
प्रशासकीय अधिकारी विरेंद्र वामनराव भोयार (५२, रा. प्रभात कॉलनी) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसानी आरोपी सुरेशा शालिकराम राजुगुरे (६८, रा. नांदगावखंडेश्वर) याच्याविरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करून मारहाण केल्याप्रकरणी भादंवि कलम ३५३, ४५२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. सदर आरोपीने माहितीच्या अधिकारात दिलेल्या सात अर्जांची माहिती देण्याकरिता फिर्यादी यांच्याशी हुज्जत घातली. सदर आरोपी कुठलीही परवानी न घेता प्रशासकीय अधिकारी यांच्या कक्षात शिरला. त्यानंतर आरोपीने वाद घालून भोयार यांचे शर्ट पकडून त्यांना खोलीत ओढत मारहाण केली. तसेच टेबलवरील फाईलची फेकाफेक करून गोंधळ घातला. त्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पोलिसानी आरोपीविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.