नियुक्ती नियमबाह्य : व्यवस्थापन परिषद सदस्यांचा आक्षेपअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मोहन खेडकर आणि बीसीयूडीचे संचालक अजय देशमुख यांच्याविरुद्ध फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. तक्रारीमध्ये अजय देशमुख यांची प्राचार्यपदाची नियुक्ती नियमबाह्य असल्याचा आरोप विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेकडून करण्यात आला आहे. याप्रकरणाची पोलीस चौकशी सुरु झाली आहे. बीसीयूडीचे संचालक अजय देशमुख यांनी अचलपूर येथील कढी कला महाविद्यालयात आठ वर्षे प्राचार्यपदाचा अनुभव घेतला. या पदाची लिन घेऊन अजय देशमुखांनी विद्यापीठाचे बीसीयूडी पद मिळविले होते. संचालक पदावर आरुढ होण्यासाठी त्यांनी शासन आणि यूजीसीने दिलेल्या नियमाचे पालन करणे अत्यावश्यक होते. नियमानुसार परिषद आणि कार्यशाळेसाठी एपीआयमध्ये अधिकाअधिक स्कोर ३० असायला पाहिजे होता. मात्र, त्यांनी बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून एपीआय स्कोर चक्क १०० टक्के दाखविला आहे. त्यामुळे त्यांची नियमाबाह्य प्राचार्यपदावर नियुक्ती झाली आहे, असा आरोप देशमुखा यांच्यांवर लावण्यात आला आहे. अजय देशमुखांविरोधात व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश सिंह यांनी व्यवस्थापन परिषदेच्या सभेत प्रस्ताव मांडला होता. विजय चौबे यांनी प्रस्तावाचे अनुमोदन केले होते. मात्र, कुलगुरु मोहन खेडकर यांनी तो प्रस्ताव फेटाळून लावला होता. प्राचार्य पदासाठी एपीआय स्कोर नसतानाही विद्यापीठाने अजय देशमुखांना प्राचार्यपदासाठी मान्यता कशी दिली, असा आक्षेप राजेश सिंह यांनी घेतला आहे. या प्रकरणासंदर्भात अजय देशमुखांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांना पाठीशी घालणारे कुलगुरू मोहन खेडकर यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी राजेश सिंह, विजय चौबे आणि राजेंद्र प्रसाद यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केली आहे. (प्रतिनिधी)कुलगुरूंना राजीनामा नामंजुरीचे पत्रबीसीयुडी संचालक अजय देशमुखांनी नियमबाह्य एपीआय सादर केल्याचा आरोप व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी केला होता. त्यांच्याविरोधात पोलीस तक्रार झाल्याचे समजताच त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. याप्रकरणाची चौकशी संपेपर्यंत देशमुखांचा राजीनामा मंजूर करू नये, असे पत्र विजय चौबे यांनी कुलगुरुंना दिले आहे. मात्र, बुधवारी सायंकाळी कुलगुरुंनी राजीनामा मंजूर केला आहे.
बीसीयूडी संचालकाची पोलीस चौकशी सुरू
By admin | Updated: May 3, 2015 00:28 IST