अमरावती : दिवाळी सण साजरा करण्यासाठी घरी आलेल्यांना परत जाण्यासाठी रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळणे दुरापास्त झाले आहे. रेल्वे आरक्षण खिडक्यांवर २० नोंव्हेबरपर्यत ‘नो-रुम’ झळकत असल्यामुळे अनेकांनी रेल्वे गाड्यांच्या आरक्षणासाठी दलालांशी संपर्क साधला आहे. मात्र पुणे, मुंबईसाठी चक्क एक हजार रुपयांच्या तिकीटाकरीता पाच हजार रुपये घेतले जात असल्यामुळे अनेकांच्या उत्सवावर विरजण आले आहे. सुट्या संपताच परत जाणे आवश्यक असल्यामुळे अनेकांनी रेल्वे तिकीट विक्री करणाऱ्या दलालांची मागणी पूर्ण करण्याची तयारी दर्शविली आहे.अमरावती रेल्वे स्थानकावरील रेल्वे आरक्षण खिडक्यांवर दलालांचा सुळसुळाट ही नित्याचीच बाब असताना हा प्रकार रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलही हतबल झाले आहे. तिकीटांची विक्री करणाऱ्या दलालांचे थेट रेल्वे अधिकाऱ्यांशी संबंध असल्यामुळे त्यांची आरक्षण खिडक्यावर चलती आहे. आदल्या दिवसाच्या तिकीटांसाठी रात्री १२ वाजेपासूनच दलालांची माणसे रांगेत उभी राहतात. त्यामुळे सामान्य व्यक्ती रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळविण्यास येताच त्याला सकाळी आठ वाजताच ५० ते ६० जणांची रांग लागलेली आढळून येते. हा प्रकार दिवाळी उत्सवापुरताच नसून दलालांची माणसे नेहमीच रांगेत लागलेली राहतात, हे वास्तव आहे. अमरावती रेल्वे स्थानकावर तिकीटांचा काळा बाजार करण्यासाठी चांदुर रेल्वे, धामणगाव, बडनेरा व अमरावती येथील दलालांची माणसे रांगते उभी राहत असल्याची माहिती आहे. सामान्य व्यक्तीला रेल्वे गाड्यांचे आरक्षण नाही, मात्र रेल्वे तिकीटांची चढ्या दरात विक्री करणाऱ्याला प्राधान्य असे चित्र हल्ली रेल्वे आरक्षण खिडक्यावर आहे. दिवाळीचे औचित्य साधून मागील दोन महिन्यापूर्वीच रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या अनेक दलालांनी तिकीटांचे आरक्षण करुन ठेवले आहे. हे रेल्वे गाड्यांच्या तिकीटांचे आरक्षण आता अव्वाच्या सव्वा दरात विक्री केले जात आहे. विशेषत: पुणे, मुंबईच्या आरक्षण तिकीटांना हजारो रुपये मोजले जात आहे. रेल्वेचा प्रवास सुखकर म्हणून अनेक जण रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळेल त्या दरात खरेदी करण्याची तयारी दर्शवित असल्यामुळे दलालांनी तिकीटांचे दर वाढविले आहे.मुंबई, पुणेकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यत आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे आॅक्टोंबरमध्ये मिळणाऱ्या रेल्वे आरक्षण तिकीटांसाठी दलालांच्या मर्जीनुसार रक्कम मोजली जात आहे. एकिकडे प्रवाशांची आर्थिक लूट चालली असताना रेल्वे प्रशासन मूकपणे हे सर्व बघत आहे. या प्रकाराला रेल्वे प्रशासन जबाबदार असून रेल्वे पोलिसांचे दलालांशी लागेबांधे आहेत. हा प्रकार थांबविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वेळीच योग्य दखल घेण्याची मागणी प्रवासीवर्गाकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)
रेल्वे तिकीट दलालांची बल्ले-बल्ले
By admin | Updated: October 25, 2014 02:04 IST