अन्याय : कोरडवाहू शेतकरी अडकले चक्रव्यूहातचांदूरबाजार : एक वर्षापेक्षा थकीत कर्जाचे पुनर्गठन करण्यास बँकांनी नकार दिल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर शेती पडीक राहिली आहे.शासनाच्या कर्जाच्या पुनर्गठन घोषणेमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला होता. मात्र जेव्हा हे शेतकरी थकीत कर्जाच्या पुनर्गठनासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत गेले तेव्हा तुम्ही शासनाच्या ‘जी.आर.’ नियमात बसत नसल्यामुळे तुम्हाला नविन कर्ज मिळणार नाही म्हणून बँकेतून परतविले. याचा फटका येथील संजय राऊत या शेतकऱ्यालाच बसला असे नाही तर विदर्भातील ८५ टक्के कोरडवाहू शेतकरी या शासनाच्या भुलभूलैया ‘जीआर’ च्या घरीच्या ‘चक्रव्यूहात’ अडकले आहेत. त्यामुळे मनोधैर्य खचलेल्या राऊत यांनी थेट मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांना निवेदन पाठवून आत्महत्येची पाळी आणू नका, असा इशारा दिला आहे.संजय राऊत यांची मिर्झापूर येथे १ हेक्टर ७४ आर शेती आहे. या शेतावर त्यांनी २००९-१० या वर्षात खरीप पिकासाठी कर्ज घेतले. गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे कर्जाची परतफेड होऊ शकली नाही. दुर्दैवाने याच काळात त्यांच्या पत्नीचा अपघात झाला. यात त्यांच्या पत्नीचे दागिनेसुध्दा विकावे लागले. शासनच्या पुनर्गठन घोषणेमुळे राऊत यांच्या आशा पल्लवित झाल्या खऱ्या मात्र, त्या फार काळ टिकू शकल्या नाहीत. स्थानिक स्टेट बँकेने त्याचे एक वर्षापेक्षा अधिक काळाचे कर्ज पुनर्गठन करण्यास नकार दिला व नवीन कर्जाचाही अर्ज बंद केला असल्याने संताप व्यक्त होत आहे.शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे दरवर्षी शेतकरी आत्महत्येत वाढ होत आहे. शासनाने शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढले नाही तर पुढेही हेच घडत राहणार. ६० लाखांची शेती गहाण ठेवणाऱ्या शेतकऱ्याची १० लाखांची पत नसावी यापेक्षा शेतकऱ्यांचे दुर्दैव ते कोणते? - राजाभाऊ देशमुख, शेतकरी, गणोजा.
एक वर्षापेक्षा थकीत कर्जाचे पुनर्गठन करण्यास बँकेचा नकार
By admin | Updated: July 11, 2015 01:37 IST