मागणी : नाभिक संघटनेचे तहसीलदारांना निवेदन वरूड : पंढरपूरच्या निवृत्ती महाराज वक्ते यांनी ‘संत तुकाराम संदेश वैकुंठ गमन’ या पुस्तकामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेवर टीका केली आहे. यामुळे गुरूदेवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे स्थानिक संत नगाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट आणि नाभिक समजाबांधवाच्यावतीने लेखकाचा निषेध नोंदवून या वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालून लेखक व संपादकाविरुध्द कारवाईची मागणी करणारे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. निवेदनानुसार पंढरपूरच्या निवृत्ती महाराज वक्ते यांनी ‘संत तुकाराम संदेश वैकूंठ गमन ’ या पुस्तकामध्ये वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगितेवर टीका करुन वादग्रस्त विधान केले. असभ्य भाषेचा प्रयोग करुन ‘ ग्रामगीतेला ’ हीन ठरविण्याचा प्रयत्न केला. तर पेज नं १६० तसेच २४० मध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘हिंदू विध्वंसक’ म्हणून अपमानित करण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार सामाजिक स्थिरता अस्थिर करण्याचा असून महामानवांना अपमानित करण्याचा आहे. या घटनेचा तिव्र निषेध करुन ‘संत तुकाराम संदेश वैकूंठ गमन ’ या पुस्तकावर बंदी घालण्यात येवून लेखक आणि संपादकाविरूद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन संत नगाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट आणि नाभिक समाजबांधवाच्या वतीने तहसिलदार आशिष बिजवल यांना देण्यात आले. यावेळी चंद्रशेखर विलास साखरकर, प्रविण सावरकर , राजीव बाभूळकर, राकेश खैरकर, रमेश माधूरकर, राजेश मिसळकर, रमेश आसोलकर, हेमंत देशमुख, मनोज कडू, भालचंद्र चौधरी, रुपेश निंभोरकर, पंकज घावरे , लिलाधर आजनकर सह शेकडो नाभिक समाज बांधव उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोेजी महाराज हे महान संत होते. त्यांच्याबद्दल असे अनुचित वक्तव्य कदापिही खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे. या पुस्तकावर तातडीने बंद आणण्याची मागणी यावेळी प्रामुख्याने करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
‘संत तुकाराम सदेह वैकुंठ गमन ’पुस्तकावर बंदी आणा
By admin | Updated: September 2, 2016 00:12 IST