खोडकेंना हादरा : विभागीय आयुक्तांचा निर्णयअमरावती : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अविनाश मार्डीकर यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांनी गुरुवारी दिला. यापुर्वी मार्डीकरांना गटनेतापदावरुन हटविणे तर आता सदस्यत्व रद्द करण्यात आल्याने संजय खोडके गटाला हा जबर हादरा असल्याचे मानले जाते. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या या निर्णयाविरुध्द शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मार्डीकर यांनी प्रोटेक्शन याचिका सादर केली आहे. राष्ट्रवादीत उफाळून आलेला अंतर्गत वाद कुणाच्या पथ्यावर पडणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने गटनेतेपदी नियुक्त केलेले सुनील काळे यांनी ७ एप्रिल २०१४ रोजी विभागीय आयुक्त डी.आर. बनसोड यांच्याकडे महाराष्ट्र स्थनिक स्वराज्य संस्था सदस्य अपात्रता अधिनियम १९८६ आणि महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था सदस्य अपात्रता नियम १९८७ प्रमाणे अविनाश मार्डीकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत अर्ज सादर केला होता. याप्रकरणी सुनील काळे यांनी सादर केलेल्या अर्जावर वादी-प्रतिवादींच्या वकिलांकडून रितसर बाजू ऐकून घेतली. विभागीय आयुक्तांनी सदस्यत्व अपात्र ठरविण्याचा घेतलेला निर्णय हा राजकीय दबावाचा आहे. यापूर्वी गटनेतेपदाबाबत तडकाफडकी तारीख बदलविण्याचा डावदेखील विभागीय आयुक्तांनी रचला आहे. एका महत्त्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाखाली निर्णय घेणे योग्य नाही. यानिर्णयाविरूध्द उच्च न्यायालयात प्रोटेक्शन याचिका दाखल केली आहे.या याचिकेवर २५ जुलै रोजी तारीख निश्चित करताना ३० जुलैपर्यंत विभागीय आयुक्तांचा निर्णय बंधनकारक राहणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. -अविनाश मार्डीकर.
अविनाश मार्डीकर यांचे सदस्यत्व रद्द
By admin | Updated: July 26, 2014 01:14 IST