४.५ कोटींचा खर्च : वाहतुकीवर नियंत्रणअमरावती : वाढते शहरीकरण, फेरीवाल्यांचे अतिक्रमण व रस्त्यांच्या झालेल्या अरूंद बोळींमुळे पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. त्यावरील उपाययोजनेचा एक भाग म्हणून महापालिकेने ‘फुल्ली आॅटोमेटेड पार्किंग’ची चाचपणी सुरू केली आहे. शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असताना वाहतूक नियंत्रण आणि त्याच अनुषंगाने पार्किंगचा मुद्दा अलीकडे अतिशय क्लिष्ट आणि आव्हानात्मक झाला आहे. व्यावसायिक संकुल असोत वा वाणिज्यिक इमारती, या ठिकाणी पार्किंगची पुरेसी व्यवस्था नसल्याने सुरक्षित पार्किंग आणि वाहतुकीचा मुद्दा प्रकर्षाने ऐरणीवर आला आहे. शहरात चार चाकी वाहन घेऊन मार्केटिंग करणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. जेथे दुचाकी पार्क करण्यासाठी जागा नाही तेथे चार चाकी वाहनांच्या पार्किंगची मोठी समस्या आहे. ही समस्या निकाली काढण्याच्या दृष्टीने शहरात चारचाकी वाहनांसाठी पार्किंगस्थळ विकसित करण्याचा मानस मनपा आयुक्त हेमंत पवार यांनी व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने पवार यांनी शनिवारी नेहरू मैदान आणि गांधी चौकातील जागेची पाहणी केली. टाऊन हॉललगत ५ हजार चौरस फूट व गांधी चौक भागात २५०० ते ३००० चौरस फूट जागा आहे. येथे मल्टीलेवल पार्किंगची शक्यता लक्षात घेवून आयुक्तांनी सूक्ष्म पाहणी केली आहे. या ठिकाणी मल्टी टुरिस्ट पार्किंग करण्याची योजना आहे. या दोन ठिकाणी मल्टिलेवल आणि मल्टीटुरिस्ट पार्किंग उभारल्यास पार्किंगचा मोठा प्रश्न निकाली निघू शकतो. ‘फुल्ली आॅटोमेटेड पार्किंग’ म्हणून उभय स्थळांचा विकास करण्यासाठी सुमारे ४.५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मानवरहित आॅटोमेटेड पार्किंगमध्ये सेन्सर लावलेले असतील, अशीही भविष्यकालीन योजना आहे. सुमारे ३०० पेक्षा अधिक वाहने उभय ठिकाणी पार्क केली जाऊ शकतील, अशी योजना बनविण्यावर पालिकेचा भर राहणार आहे. उभय तंत्रज्ञानयुक्त पार्किंग स्थळाची उभारणी बीओटी तत्त्वावर करायची की, मनपाने तो खर्च स्वत: उचलायचा, यावर मंथन केले जाणार आहे. निधी कसा उभारायचा, हे निश्चित केल्यानंतर या भविष्यकालीन योजनेच्या अंमलबजावणीवर शिक्कामोर्तब होणार आहे. आतापर्यंत चारचाकी वाहने दोन्ही उड्डाण पुलाखाली पार्क केली जायची. मात्र या उड्डाण पुलाखालील जागा पे अॅन्ड पार्किंग म्हणून विकसित होणार असल्याने पार्किंगचा मुद्दा अधिक तापणार असल्याची चिन्हे आहेत. त्या अनुषंगाने नेहरु मैदान व गांधी चौकालगतच्या दोन्ही जागांवर आॅटोमेटेड पार्किंग व्यवस्था होणे गरजेचे झाले आहे. या भविष्यकालीन योजनेबाबत आयुक्त हेमंत पवार सकारात्मक असल्याने ही योजना लवकरच प्रत्यक्षात उतरेल, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. शहरातील कुठल्याही मार्केटसमोर चारचाकी वाहने पार्क करायला जागा उपलब्ध नाही. पार्किंग केल्यासही दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत होऊन वाहतुकीचा बोजवारा उडतो. (प्रतिनिधी)मेट्रो शहरांमध्ये आॅटोमेटेड मल्टिलेवल पार्किंग यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्याच धर्तीवर शहरातील दोन ठिकाणी ही संकल्पना राबविण्याचे नियोजन आहे. - हेमंत पवारआयुक्त, मनपा, अमरावती.
आॅटोमेटेड पार्किंगची चाचपणी
By admin | Updated: June 28, 2016 00:13 IST