सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोडेखोर कैद, पोलिसांनी दाखल केला गुन्हा
परतवाडा : स्थानिक सिव्हील लाईन निवासी कपडा व्यवसायी अजय व प्रकाश चंदणानी यांच्या घरात घुसून बंदुकीच्या धाकावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न अज्ञात दरोडेखोराने केला. घरातील महिलांच्या संयम व समयसुचकतेमुळे हा प्रयत्न फसला.
शुक्रवार २५ डिसेंबरला रात्री १०.३० वाजता दरम्यान एक अज्ञात इसम हातात बंदुक घेऊन चंदणानी यांच्या घरात घुसला तेेव्हा घरात केवळ महिला हजर होत्या. दरम्यान किचनमध्ये असलेल्या मंजू अजय चंदणानी यांच्या कानाजवळ पिस्टल ठेवत पैशाची मागणी केली. रोकड निकालो म्हणत धमकावण्याचा प्रयत्न केला. घरातील अन्य महिला व मुलींना स्वत:ला सुरक्षित ठेवत एका खोलीत बंद करून घेतले.
यातच घरात पुरुषवर्ग आहे. रोकड नाही, असे त्याला सुनावताच त्याने त्याच महिलेच्या कानाजवळ बंदूक ताणून तिला दरवाज्यापर्यंत नेले आणि तो घटना स्थळाहून पसार झाला.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पी.जे. अब्दागिरे, ठाणेदार प्रदीप चौगांवकर यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजची ही पोलिसांनी पाहणी केली. यात एक अज्ञात इसम तोंडाला रुमाल बांधलेल्या स्थितीत आढळून आला आहे.
तक्रारीच्या अनुषंगाने परतवाडा पोलीसांनी भादवी ३९२ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ते करीत आहेत.