फोटो पी १४ लेहगाव
लेहेगाव : ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने राजेश नानकराम भलावी (रा. तळणी, ता. मोर्शी) या अट्टल दुचाकी चोराला अटक केली. त्याच्याकडून ९ दुचाकी जप्त करण्यात आल्या. ११ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली.
आरोपी राजेश भलावी हा चोरीच्या दुचाकी वापरण्याचा व विकण्याचा सवयीचा आहे व त्याच्या जवळ एक दुचाकीसुद्धा आहे, अशा माहितीवरून गुन्हे शाखेचे पथक तळणी येथे पोहोचले. त्याच्याकडील एका दुचाकीच्या कागदपत्राबाबत विचारपूस केली असता त्याने कुठलेही कागदपत्र दाखविले नाही. चौकशीदरम्यान ती दुचाकी ही राजुरा बाजार (ता. वरुड) येथून चोरल्याचे त्याने सांगितले. त्याच्या घराची पाहणी केली असता तेथे अजूून २ दुचाकी आढळून आल्यात. त्यादेखील चोरीच्या असल्याचे त्याने सांगितले.
येथून चोरल्या दुचाकी
नागपूर जिल्ह्यातील नरखेड, कळमेश्वर, मध्यप्रदेश येथून दुचाकी चोरल्या. पैकी काही दुचाकी या नेरपिंगळाई येथे विकल्याची माहिती आरोपीने दिली. त्या माहितीवरून नेरपिंगळाई येथून एकूण सहा दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे नमूद आरोपीकडून ३ लाख ६० हजार रुपये किमतीच्या ९ दुचाकी जप्त करण्यात आल्या. सर्व दुचाकींच्या नंबर प्लेट या बनावटी असून चेसीस नंबरसुद्धा खोडलेले आहेत. त्याच्याविरुद्ध नरखेड (जि. नागपूर), आसेगाव (जि. अमरावती) येथील चोरीचे गुन्हे उघडकीस आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात पोउपनि सूरज सुसतकर, नापोकॉ युवराज मानमोठे, दीपक सोनाळेकर, चेतन दुबे, संदीप लेकुरवाळे, स्वप्निल तंवर, अमित वानखडे, सागर धापड व चालक संदीप नेवारे यांनी केली.