अमरावती : चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातील कुऱ्हा बिटमध्ये पाळीव जनावरांवर बिबट्याचे हल्ले सुरुच आहेत. चिरोडी जंगल क्षेत्रात बिबट्याने एका वासराची शिकार केली तर भिवापूरमध्ये दोन वासरांवर तसेच वाढोण्यात एका बकरीवर हल्ला केला. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चांदूररेल्वे, वडाळी वनपरिक्षेत्रात येणाऱ्या जंगलात चार ते पाच बिबट्यांचा अधिवास आहे. गेल्या काही वर्षात या दोन्ही वनपरिक्षेत्रांमध्ये अनेकदा बिबट आढळला. पोहरा, चिरोडी, माळेगांव, भिवापूर, वाढोणा, वीरगव्हाण या भागात बिबट अनेकदा नागरिकांच्या दृष्टीस पडला. जंगलाशेजारच्या गावांमध्ये अनेकदा गावकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ले करुन बिबट्याने त्यांना ठार केले. त्यामुळे जंगलाशेजारी राहणाऱ्या गावांमध्ये बिबटची दहशत पसरली आहे. गेल्या काही दिवसांत चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातील कुऱ्हा बिटमध्ये येणाऱ्या माळेगाव व भिवापूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. कुऱ्हा बिट अंतर्गत येणाऱ्या वाढोण्यात बिबट्याने नुकतीच बकरीवर हल्ला चढविला होता. चिरोडी परिसरातही एका वासराला बिबट्याने ठार केले. तर भिवापूरमध्येही दोन वासरांची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे नागरिक हैराण आहेत.
कुऱ्हा बिटमध्ये बिबट्याचे जनावरांवर हल्ले सुरुच
By admin | Updated: October 6, 2014 23:05 IST