फौजदारीचे निर्देश : चौकशी सुरूअमरावती : अनधिकृत बांधकामाची मोजणी करण्यास गेलेल्या महिला सहायक आयुक्तांना मोजणीपासून रोखण्यात आले. टोपेनगर परिसरातील विदर्भ हाऊसिंग कॉलनीत ११ मार्चला हा प्रकार घडला. आयुक्तांनी फौजदारीचे आदेश दिल्यानंतर शहर कोतवालीत त्या अनधिकृत बांधकामधारकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. रामदास राजाराम काळे व त्यांच्या पत्नीविरोधात झोन क्र. २ चे अभियंता प्रदीप वानखडे यांनी १७ मार्चला ही तक्रार दाखल केली आहे. ११ मार्चला मध्य झोन क्र. २ च्या सहायक आयुक्त प्रणाली घोंगे या रामदास काळे यांनी विनापरवानगी केलेल्या अनधिकृत बांधकामाची मोजणी करावयास गेल्या. त्यावेळी काळे दाम्पत्याने याच मुलास आत येण्यास मज्जाव केला. तथा मोजमाप होऊ दिले नाही. बांधकाम थांबविणार नाही, असे सांगून शिवीगाळ केली. १० मार्चलासुद्धा झोन अभियंता व अन्य कर्मचारी मोजमाप करण्यास गेले असता काळे दाम्पत्याने मज्जाव केला. महिनाभरापूर्वी पत्र देऊन विना परवानगी बांधकाम त्वरित थांबवावे, अशी सूचना केल्यानंतरही काळे यांनी अनधिकृत बांधकाम थांबविले नाही. काळे व त्यांच्या पत्नीने नोटीसची अवमानना करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी विनंती तक्रारीतून केली आहे. (प्रतिनिधी)रामदास काळे व त्यांच्या पत्नीने बांधकाम थांबविण्याबाबत दिलेल्या नोटीसची अवमानना करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. मोजणी करण्यास मज्जाव करून शिवीगाळसुद्धा केली.- प्रणाली घोंगे, सहायक आयुक्त, मध्य झोन क्र. २
सहायक आयुक्तांना मोजणीपासून रोखले
By admin | Updated: March 20, 2016 00:15 IST