खळबळ : अचलपूर बाजार समिती निवडणूक, दोन उमेदवार रिंगणात अचलपूर : अचलपूर बाजार समितीच्या आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातील उमेदवार अश्विनी प्रवीण तायडे यांची उमेदवारी आज मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द ठरविल्याने सहकार गटात खळबळ उडाली आहे. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतील आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातील सहकार पॅनलच्या उमेदवार अश्विनी प्रवीण तायडे यांनी एप्रिल २०१५ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढविताना पती-पत्नीचे वार्षिक उत्पन्न कोटींवर असल्याचा दाखला जोडला होता. त्यानंतर चार महिन्यांनी बाजार समिती निवडणुकीत केवळ २० हजार रूपयांचे उत्पन्न व ४५ आर. शेतजमीन दाखविली. याविरोधात अपक्ष उमेदवार कुलदीप प्रभाकर काळपांडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधकांकडे तशी तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यावर त्यांनी आपला योग्य निर्णय दाखविला. पुन्हा काळपांडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. त्यामध्ये स्वत:चा रद्द झालेला उमेदवारी अर्ज योग्य ठरविला. न्यायालयाने तसे आदेश दिले. त्यानंतर मंगळवारी न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्या न्यायालयाने अश्विनी प्रवीण तायडे यांची मालमत्ता अधिक आहे. आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघात त्या बसत नाहीत. त्यामुळे खऱ्या उमेदवारावर अन्याय होणार असल्याची बाजू वकिलांनी मांडली. त्यावर अश्विनी तायडे यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)सहकार क्षेत्रात खळबळअश्विनी तायडे यांची उमेदवारी रद्द झाल्याने सहकार पॅनलमध्ये खळबळ उडाली आहे. २६ जुलै रोजी बाजार समितीच्या १८ जागांसाठी मतदान होऊ घातले आहे. अशातच सहकार पॅनलला जोरदार हादरा बसला आहे. अश्विनी तायडे यांची उमेदवारी रद्द झाल्याने ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघात आता समता पॅनलचे सुधीर शेषराव रहाटे व याचिकाकर्ता उमेदवार कुलदीप प्रभाकर काळपांडे अशी दुहेरी तुल्यबळ लढत होणार की कुलदीप काळबांडे अविरोध निवडून येणार, याबाबत चर्चा सुरू आहेत. रहाटेंबाबत उद्या निर्णयआर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातील समता पॅनलचे उमेदवार सुधीर रहाटे यांच्या विरुद्धच्या याचिकेवर उद्या २३ जुलै रोजी नागपूर खंडपीठात निर्णय होणार आहे. त्यांनी उत्पन्नाचे दोन दाखले जोडल्याने त्याचे स्पष्टीकरण दाखले देणाऱ्या नायब तहसीलदारांनी हजर राहून दिले. कुलदीप काळपांडे यांच्या बाजूने विधिज्ञ एम.पी. खारिया, महेश देशमुख व निकेश धोपे यांनी कामकाज पाहिले.
अश्विनी तायडेंची उमेदवारी न्यायालयात रद्द
By admin | Updated: July 23, 2015 00:09 IST