अमरावती : पंचायत राज समितीच्या दौऱ्यापूर्वी राज्यपाल सी. विद्यासागर राव दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. शनिवारी राज्यपालांचा अधिकृत दौरा कार्यक्रम आला. ते २ नोव्हेंबरला सकाळी १०.४५ ला चिखलदरा येथे येणार आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राज्यपाल मोथा येथील स्ट्रॉबेरी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर आमझरी येथील इकोटुरिझम सेंटरला भेट देऊन एकात्मिक वनहक्क लाभार्थ्यांसोबत संवाद साधतील. त्यानंतर चिखलदरा येथे दुपारी ३.३० ते ५ वाजेपर्यंत पालकमंत्री, आदिवासी विकास, महिला व बालकल्याण व आरोग्य विभागाच्या सचिवांशी आरोग्य व कुपोषणासंदर्भात बैठक घेतील. त्यानंतर चिखलदरा येथील एमटीडीसी रेस्ट हाऊसमध्ये त्यांचा मुक्काम राहणार आहे. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ३ नोव्हेंबरला ते गाविलगड किल्ल्याची पाहणी करतील. तेथून रोमन कॅथालिक मिशनमधील कॉफी लागवडीस भेट देऊन ते पंचबोल पॉर्इंटला भेट देणार आहेत. पंचबोल पॉर्इंट येथून सकाळी १०.१५ च्या सुमारास राज्यपाल संत गाडगेबाबा विद्यापीठातील हेलिपॅडवर उतरून शासकीय विश्रामगृहाकडे रवाना होतील. सकाळी ११ ते १२.३० या कालावधीत अमरावती विभागातील सिंचन अनुशेषासंदर्भात बैठक घेणार आहेत. अमरावती शहरामध्ये राज्यपालांची हीच एकमेव बैठक असणार आहे. त्यानंतर दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास राज्यपाल राजभवन मुंबईकडे रवाना होतील. (प्रतिनिधी)
पीआरसीपूर्वी राज्यपालांचे आगमन
By admin | Updated: November 1, 2015 00:26 IST