अमरावती : दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेला विनोद शिवकुमार याला पाठीशी घालणारे मुख्य वनसरंक्षक एम.एस. रेड्डी यांना सहआरोपी करून, त्यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीने गुरुवारी विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनानुसार, दीपालीच्या आत्महत्येनंतर रेड्डी यांच्यावर कारवाईची मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे. भाजपाच्यावतीने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निदर्शने व आंदोलन करण्यात आले. मात्र, वन विभागातील आणि शासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने रेड्डी यांना अभय मिळत आहे. दीपालीच्या सुसाईड नोटमध्येदेखील रेड्डी काहीच कारवाई करत नव्हते, असे दीपालीने लिहिले आहे. मग रेड्डीवर थातूरमातूर बदलीची आणि निलंबनाची कारवाई का? रेड्डी यांना सहआरोपी का? करण्यात आले नाही, असा सवाल भाजपाने केला आहे. निवेदन देतेवेळी माजी मंत्री सुनील देशमुख, जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे, भाजपाचे महाराष्ट्र प्रवक्ता शिवराय कुळकर्णी उपस्थित होते.
बॉक्स
शिवकुमारला व्हीआयपी सुविधा
अटकेतील आरोपी विनोद शिवकुमार याला इतर आरोपींशिवाय व्हीआयपी सुविधा मिळाली. जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. आणि अपर मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध असल्याचेदेखील सर्वत्र सांगितले जात आहे. त्यामुळे दीपालीला न्याय मिळवून देण्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाचा उच्चस्तरीय तपास व्हावा, अशी मागणी भाजपाने आयजींकडे केली.