प्रवाशांची सुरक्षा : एक्स्प्रेस, मेल गाड्यात आरपीएफ घालणार गस्तअमरावती : धावत्या रेल्वे गाड्यात दरोडे, चोरी, खिसेकापू आणि प्रवाशांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी मेल, एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये सशस्त्र पोलीस पहारा दिला जाणार आहे. ही जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलावर (आरपीएफ) सोपविण्यात आली आहे.रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेचा कारभार रुळावर आणण्यासाठी अनेक उपाययोजनांची मुहूर्तमेढ रोवली आहे. मात्र रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर आजही प्रश्नचिन्ह असल्याची बाब सर्वसामान्य प्रवाशांची आहे. नुकत्याच पारीत झालेल्या केंद्र शासनाच्या रेल्वे अर्थसंकल्पाप्रसंगी खा. आनंदराव अडसूळ यांनी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली. मेल, एक्स्प्रेस या लांबपल्ल्यांच्या रेल्वे गाड्यात प्रवाशांची होणारी फसवणूक कधी थांबणार ही बाब त्यांनी लोकसभेत लक्षात आणून दिली. धावत्या गाड्यांमध्ये होणाऱ्या चोऱ्या, दरोडे, खिसेकापू आदी घटनांमध्ये आरोपीचा पत्तच लागत नाही. प्रवाशांची झालेली फसवणूक तो प्रवास सोडून पोलीस ठाणे गाठू शकत नाही. परिणामी रेल्वे गाड्यांना चोरट्यांनी लक्ष केल्याचे खा. अडसूळ म्हणाले. त्यानंतर अडसुळांनी रेल्वेमंत्री प्रभू यांची व्यक्तिश: भेट घेऊन प्रवाशांची कैफियत मांडणारे पत्र सादर केले. या पत्राची दखल घेत ना. प्रभू यांनी मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाड्यात सशस्त्र पोलीस पहारा ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे. ज्या भागात प्रवाशांची फसवणूक झाली त्या भागातील रेल्वे पोलिसांना जबाबदार धरण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. पॅसेजर गाड्या वगळता मेल, एक्स्प्रेसमध्ये सशस्त्र पोलीस पहारा देण्याची जबाबदारी आरपीएफवर सोपविण्यात आली आहे. तसेच रेल्वे गाड्यात अवैध खाद्य पदार्थ विक्रीवर अंकुश लावण्याच्या सूचना आहेत. धावत्या गाडीत अवैध खाद्य पदार्थ विक्री रोखण्याची जबाबदारी विभागीय वाणिज्य विभागावर सोपविली आहे. (प्रतिनिधी)
धावत्या रेल्वे गाड्यांत सशस्त्र पोलीस पहारा
By admin | Updated: May 2, 2016 00:27 IST