अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी नुकत्याच अभ्यास मंडळावर केलेल्या नियुक्त्या अपात्र व्यक्तीच्या असनू, त्या रद्द करण्यात याव्यात, या आशयाच्या मागणीचे निवेदन मंगळवारी एका शिष्टमंडळाने प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर यांना दिले आहे.
१२ एप्रिल रोजी विद्यापीठाद्वारे काढलेले अधिसूचना क्रमांक ५७/२०२३ नुसार विविध अभ्यास मंडळावर नामनिर्देशित करण्यासाठी लागणारी आवश्यक पात्रता नसलेल्या अध्यापकांना नामनिर्देशित केले आहे. ही अधिसूचना काढून विविध विद्याशाखेतील विविध अभ्यास मंडळावर महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ मधील कलम ४०(२) (ब), (आय), ४० (२) या कलमांचा वापर करून सहा अध्यापकांना नामनिर्देशित केले. त्यापैकी पदव्युत्तर अध्यापकांमधून दोन अध्यापकांना नियुक्त करणे अपेक्षित होते. परंतु राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, इंग्रजी या विषयांमध्ये नामनिर्देशासाठी लागणारी आवश्यक पात्रता नसताना सुद्धा अध्यापकांची वर्णी लागली आहे.
त्यामुळे डॉ. प्रमोद येवले यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. मान्यताप्राप्त विभाग प्रमुख नसलेल्या तीन अध्यापक नामनिर्देशन करताना सुद्धा 'कॉमर्स अँड मॅनेजमेंट' या विद्याशाखेमध्ये सुद्धा ज्या अध्यापकांनी विभाग प्रमुख म्हणून मतदान केलेले आहेत. त्याच अध्यापकांना दुसऱ्या अभ्यास मंडळामध्ये विभाग प्रमुख नसलेल्या प्रवर्गातून नऊ अध्यापकांच्या नियुक्त केलेल आहेत.
विशेषतः ज्या संलग्नित महाविद्यालयामध्ये संबंधित विषयातील पदवीधर अभ्यासक्रम आहेत व त्या विषयांना शिकविणारे मान्यताप्राप्त पदव्युत्तर अध्यापक आहे, अशी सलग्नित महाविद्यालयामधील दोन मान्यता प्राप्त पदव्युत्तर अध्यापकांचे नामनिर्देशन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी संबंधित विद्याशाखेच्या अधिष्ठात्याशी विचार विनिमय करणे अपेक्षित होते. परंतु दुर्दैवाने असे झाले नाही. अपात्र व्यक्तींच्या नियुक्त्या रद्द करण्यासाठी सिनेट सदस्य प्रशांत विघे, समीर जवंजाळ, अक्षय साबळे, सागर कलाने, ओमप्रकाश झोड यांनी निवेदनातून केली आहे.
मराठवाडा विद्यापीठाचा अमरावतीत पायंडा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी २०१९ मध्ये अशाच प्रकारच्या चुकीच्या नियुक्ती केल्या होत्या. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निकाली काढलेला असून ज्या महाविद्यालयांत पदव्युत्तर शिक्षण घेतल्या जाते. त्याच महाविद्यालयातील शिक्षकांना नामनिर्देशित करता येईल, असा स्पष्ट निवाळा दिला आहे. तरीही कुलगुरू डॉ. येवले यांनी हीच कृती अमरावती विद्यापीठावर थोपविली आहे.