अंजनगाव सुर्जी : स्वच्छ शहर व सुंदर शहराची संकल्पना अंजनगाव नगरपालिकेने धुळीस मिळविली असून शहरात ठिकठिकाणी घाणीचे सम्राज्य निर्माण झाले आहे. स्थानिक नगरपरिषदेचे याकडे दुर्लक्ष होत शहरात सर्वत्र घाणीचे सम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे डेंग्यूसदृश आजाराचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. शहरातील ३०० ते ४०० रुग्ण सद्यस्थितीत परतवाडा-आकोट-अकोला-अमरावती येथील रुग्णालयांत दाखल आहेत. ऐन दिवाळीच्या दिवशी सुध्दा अनेक कुटुंबांना खासगी व शासकीय रूग्णालयाच्या खेपा कराव्या लागल्या. विचित्र तापाने बाधित रूग्णाच्या शरीरातील पेशींचे प्रमाण अकस्मात कमी होते आणि चक्कर येणे, डोकेदुखी सुरू होते. परंतु या आजाराचे योग्य निदान करणारी पुरेशी आरोग्य यंत्रणा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील आरोग्य विभागाजवळ उपलब्ध नाहीत. त्यामुळे साथरोगांचा फैलाव वेगाने होत आहे. योग्य व्यवस्थेअभावी रुग्णांना बाहेरगावी पाठवावे लागते. या जीवघेण्या आजारामुळे आतापर्यंत शहरात तीन रुग्ण दगावले आहेत. याची रितसर लेखी तक्रारसुध्दा आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. परंतु नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने केवळ तात्पुरती फवारणी करुन वेळ मारुन नेली. स्वच्छतेचा प्रश्न ही शहरातील मुख्य समस्या असून नगर पालीका प्रशासन हे सोडविण्यात अपयशी ठरली आहे. पालीका प्रशासनाने शहराची लवकरात लवकर साफसफाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहरवासीयांनी प्रशासनाला दिला आहे. साथरोगांना आळा घालण्याची सर्वस्वी जबाबदारी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचीच असून महापालिकेने शहरात युध्दस्तरावर स्वच्छता मोहीम राबविल्यास साथरोगांवर आळा घालता येऊ शकते, असे सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे. दिवसेंदिवस नगरपरिषदेच्या विरोधात नागरिकांमध्ये रोष बळावू लागला आहे.
अंजनगावात अस्वच्छतेचा कहर
By admin | Updated: October 27, 2014 22:29 IST