शंकर महाराजांच्या अटकेची मागणी : नरबळीप्रकरणाचे संतप्त पडसाद अंजनसिंगी : प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या चिमुरड्यांवर नरबळीच्या उद्देशाने झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच या आश्रमाचे संचालक संत शंकर महाराज यांच्या अटकेच्या मागणीसाठी सोमवारी कुऱ्हानजीकच्या अंजनसिंगी गावात कडेकोट बंद पाळण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन गावातून निषेध रॅली काढली. यावेळी ग्रामस्थांचा प्रचंड रोष उफाळून आला होता.अंजनसिंगीपासून कुऱ्हा हे गाव अवघ्या चार किलोेमीटर अंतरावर आहे. त्यामुळे या नरबळीच्या प्रयत्नांचे तीव्र पडसाद या गावांत उमटले आहेत. गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोष व्याप्त असून दोन निरागस बालकांचा नरबळी घेण्याचा प्रयत्न ज्या शंकर महाराजांच्या आश्रमात झाला त्या शंकर महाराजांना अद्याप अटक का नाही?, असा सवाल ग्रामस्थांनी केला. गावातून काढलेल्या निषेध रॅलीत ग्रामस्थांनी प्रचंड नारेबाजी केली. अण्णाभाऊ साठे चौकातून या रॅलीचा शुभारंभ झाला. अहल्याबाई चौक, गुरूदेव चौकातून निघालेल्या रॅलीचे बसस्थानक परिसरात निषेधसभेत रूपांतर झाले. अध्यक्षस्थानी सरपंच अवधूत दिवे होते. भाकपचे विश्वास कांबळे, भाजपचे प्रभाकर कांबळे, रिपाइंचे पंजाबराव कठाणे, काँग्रेसचे सतीश थोटे, श्रीकृष्ण गायकवाड, कैलास ठाकरे, राजाभाऊ मनोहरे, प्रमोद वैद्य, पंजाब कठाणे, दादाराव गडलिंग, भगवान चंदनखेडे यांनी मोर्चाला संबोधित केले. आश्रमशाळेची मान्यता रद्द करावी, शंकर महाराजांना अटक करावी, अटकेतील आरोपींची कसून चौकशी करावी, आश्रमाच्या संपत्तीची चौकशी करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्यात.मोर्चेकऱ्यांनी कुऱ्हा येथील ठाणेदार कांबळे यांना निवेदन दिले.
अंजनसिंगीत कडकडीत बंद, सर्वपक्षीय मोर्चा
By admin | Updated: August 29, 2016 23:58 IST