पूर्ववत करण्याची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, व्यवसाय झाला ठप्प
अंजनगाव सुर्जी : शहरातील मुख्य मार्ग असलेला डीपी रोड दोन महिन्यांपासून बंद केल्याने शहरातील नागरिकांना अडचणीस तोंड द्यावे लागत आहे. याबाबत राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिकांनी मुख्याधिकारी, तहसीलदार व नगराध्यक्षांकडे बंद रस्ता सुरू करण्याकरिता विनवनी केली. निवेदनही दिलेत. परंतु, दखल घेण्यात न आल्याने येथिल काही नागरिकांनी जिल्हाधिकारी शैलेश नवल यांची भेट घेतली.
निवेदनानुसार, हा मार्ग बंद असल्याने व्यवसायिकांना मोठा फटका बसला आहे. महिलांना बाजूच्या निर्मनुष्य मार्गाने जावे लागत असल्याने चेनस्नॅचिंगचे प्रकार होण्याची दाट शक्यता आहे तसेच हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी असल्याने तेथून प्रवास टाळणाऱ्यांची अडचण होत असल्याचे नमूद करण्यात आले.
डीपी रोडवर एका स्वीकृत नगरसेवकाचे व माजी नगरसेवकाचे घर असून, हा रस्ता बंद करण्यासाठी त्यांचाच आग्रहअसल्याचे चर्चा संपूर्ण शहरात व नगरपालिका कार्यालयात आहे. संपूर्ण देशात रस्त्यांची कामे केली जातात. मात्र, त्यासाठी रस्ता कधीही बंद केला जात नाही. डीपी मार्ग हा शहरातील प्रत्येक नागरिकाचा हक्काचा मार्ग असून, नगरपालिकेने बेकायदेशीररीत्या तो बंद कसा केला, असा संतप्त सवाल माजी नगराध्यक्ष मंजूषा लोळे यांनी उपस्थित केला.
कोट
डीपी रोड दोन महिन्यांपासून बंद असल्यामुळे किराणा व्यवसायावर परिणाम झाला आहे. उदरनिर्वाहास अडचण निर्माण होत आहे. माझ्याप्रमाणे अन्य व्यावसायिकांनादेखील मोठा फटका बसला आहे.
- धनराज बिजेवार, किराणा व्यवसायिक, अंजनगांव सुर्जी